म्हाडाच्या पणन विभागाची होणार ‘साफसफाई’!

By Admin | Updated: December 26, 2014 04:25 IST2014-12-26T04:25:52+5:302014-12-26T04:25:52+5:30

म्हाडातील सर्वाधिक मलिदा मिळणाऱ्या विभागांपैकी असलेल्या पणन विभागाची आता लवकरच ‘साफसफाई’ केली जाणार आहे

MHADA marketing department will 'clean up'! | म्हाडाच्या पणन विभागाची होणार ‘साफसफाई’!

म्हाडाच्या पणन विभागाची होणार ‘साफसफाई’!

मुंबई : म्हाडातील सर्वाधिक मलिदा मिळणाऱ्या विभागांपैकी असलेल्या पणन विभागाची आता लवकरच ‘साफसफाई’ केली जाणार आहे. या ठिकाणी नियुक्तीला असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आता अन्य विभागांमध्ये उचलबांगडी केली जाणार आहे. लाचखोरी, निलंबन आणि विभागाबाबत वाढत असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गवई यांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या ३, ४ दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल्या केल्या जाणार असल्याचे समजते.
म्हाडाने मुंबईत बांधलेल्या घरांची लॉटरी, गिरणी कामगारांसाठीच्या सोडतीतील विजेत्यांच्या अर्जांची छाननी, पात्रता, अपात्रता निश्चिती, घरांचे वितरण, त्याचा ताबा देण्याचे काम मुंबई मंडळातील पणन विभागामध्ये उपमुख्य अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत सुमारे ३० वर जणांचा स्टाफ करीत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या विभागामध्ये लाचखोरीची दोन प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. तसेच भ्रष्टाचाराबाबत तक्रार अर्जावरून विभागांतर्गत केलेल्या चौकशीतून एका लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे, त्याशिवाय या ठिकाणी कार्यरत असलेल्याबद्दल तक्रारींची संख्या वाढत असल्याने म्हाडाची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या कार्यरत असलेल्या ‘टॉप टू बॉटम’पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गवई यांनी घेतला आहे. त्यांनी आतापर्यंत केलेला सेवा कालावधी, कामाच्या ठिकाणानुसार त्यांची इतरत्र बदली केली जाईल, त्याबाबत प्रशासनाकडून अधिकाऱ्यांच्या दर्जानिहाय प्रस्ताव बनविला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. (प्रतिनिधी)

Web Title: MHADA marketing department will 'clean up'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.