म्हाडाचे सदनिका हस्तांतरण सुलभ
By Admin | Updated: July 14, 2015 01:24 IST2015-07-14T01:24:03+5:302015-07-14T01:24:03+5:30
नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समयोजित लोकसेवा देण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हमी कायद्याची महाराष्ट्र

म्हाडाचे सदनिका हस्तांतरण सुलभ
मुंबई : नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समयोजित लोकसेवा देण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हमी कायद्याची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) बुधवार, १५ जुलैपासून अंमलबजावणी करणार आहे. यानुसार विविध विभागीय मंडळांमधील ‘मित्र’ या एक खिडकी योजनेंतर्गत नागरिकांना सदनिका हस्तांतरणापासून भूखंड विक्रीस परवानगी मिळविण्यापर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार
आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा २८ एप्रिलपासून राज्यात लागू झाला. या कायद्यांतर्गत प्रशासकीय कामाबाबत नागरिकांना हमी देण्यात आली आहे. १६0 सेवांचा या कायद्यात समावेश आहे. या कायद्यांतर्गत म्हाडाच्या मुंबई येथील मुख्यालयासह नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागीय मंडळांमधील ‘मित्र’ या एक खिडकी योजनेंतर्गत नागरिकांना १० सुविधा आॅनलाइन उपलब्ध केल्या जातील.
यासंदर्भात म्हाडातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे; तसेच याची
योग्य अंमलबजावणी करण्याचे
बंधन प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहील. विहित कालावधीत सेवा न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
‘मित्र’मधील सुविधा
निवासी सदनिका / भूखंड भोगवटाबदल (हस्तांतरण), अनिवासी सदनिका / भूखंड भोगवटाबद्दल, निवासी सदनिका / भूखंड नियमितीकरण, अनिवासी सदनिका, थकबाकीबाबतचे ना देय प्रमाणपत्र, सदनिका वित्तीय संस्थेकडे तारण ठेवण्यास ना हरकत प्रमाणपत्र, सदनिका विक्री परवानगी, कर्जाची थकबाकी भरणा पत्र, निवासी सदनिका भाडेतत्त्वावर देण्यास ना हरकत प्रमाणपत्र देणे आदी सुविधा ‘मित्र’मधून आॅनलाइन दिल्या जातील.