पाच वर्षांत येणार मेट्रो-३
By Admin | Updated: February 13, 2015 02:13 IST2015-02-13T02:13:23+5:302015-02-13T02:13:23+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ प्रकल्पाचे काम २०१६ या आर्थिक वर्षात सुरू होईल आणि प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासह उर्वरित समस्या मार्गी लावूनच

पाच वर्षांत येणार मेट्रो-३
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ प्रकल्पाचे काम २०१६ या आर्थिक वर्षात सुरू होईल आणि प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासह उर्वरित समस्या मार्गी लावूनच हा प्रकल्प २०२० साली पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
३३ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी एकूण ३९.९ हेक्टर जमिनीची गरज भासणार आहे. त्यापैकी २७.२९ हेक्टर जमीन तात्पुरत्या कामासाठी लागणार आहे. त्यातील केवळ २.२५ हेक्टरच्या खासगी जमिनीचा वापर होणार आहे. मेट्रो ३ प्रकल्पासाठी कायमस्वरूपी ११.८० हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी ८.७० हेक्टरची जमीन शासकीय आणि उर्वरित ३.२० हेक्टर खासगी जमीन असणार आहे. २ हजार ४४ वृक्षांबाबत बोलताना भिडे म्हणाल्या, वृक्ष लागवड आणि पुनर्रोपणासाठी जागा निश्चित केली आहे. शिवाय पर्यावरण आणि भौगोलिक परिसरावर होणाऱ्या परिणामांचाही सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. शिवाय गिरगाव आणि काळबादेवी परिसरातील रहिवाशांवरही प्रकल्पादरम्यान अन्याय होणार नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मुख्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत अश्विनी भिडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या संस्थांशी चर्चा व समन्वय साधून तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा आमचा प्रयत्न आहे. योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय आणि रहिवाशांशी सल्लामसलत केल्यानंतरच पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईल. सार्वजनिक सुविधा पुरविणाऱ्या सेवा अन्यत्र हलविण्याबाबत बहुतेक संबंधित प्रशासकीय परवानग्या प्राप्त झाल्या असून, इतर बाबतीत तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. शासकीय भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याने या सर्व पार्श्वभूमीवर हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण केला जाईल. (प्रतिनिधी)