मेट्रो रेल्वेला मिळाली गती

By Admin | Updated: December 26, 2014 00:53 IST2014-12-26T00:53:41+5:302014-12-26T00:53:41+5:30

नागपुरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्प हा लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

Metro trains get momentum | मेट्रो रेल्वेला मिळाली गती

मेट्रो रेल्वेला मिळाली गती

प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन : प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास
नागपूर : नागपुरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्प हा लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी मौजा लेंड्रा दीक्षाभूमीसमोर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची शासन कटिबद्ध आहे. मूळ ८६८० कोटी रुपयाचा हा प्रकल्प १० हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन हे तिघेही मिळून हा प्रकल्प पूर्ण करणार आहेत. त्यासाठी शासनाने एसपीव्हीची स्थापना केली आहे. दीक्षित नावाचे रेल्वेचे अधिकारी यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी काही जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. परंतु जी जागा खाली आहे, त्यावर कामाला तातडीने सुरुवात केली जाईल आणि सोबतच जमीन अधिग्रहणाचेही काम सुरू राहील. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करून राज्य शासनाने ३० जानेवारी २०१४ रोजी आणि केंद्र शासनाने २१ आॅगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पास मंजुरी प्रदान केली आहे. मेट्रो प्रकल्प हा सन २०१८ पर्यंत कार्यान्वित करावयाचा आहे. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे आयोजित या भूमिपूजन सोहळ्यास महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर, मनपा आयुक्त श्याम वर्धने, नासुप्रचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सात माळ्याची प्रशासकीय इमारत
दीक्षाभूमीच्या समोर मौजा लेंड्रा ख.क्र. २२५ नगर भूमापन क्र. १२६१ येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या ६३५९.८४ चौरस मीटर जागेवर नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या बांधकामाकरिता नासुप्रतर्फे निविदा आमंत्रित करून कामाचा कार्यादेश कंत्राटदारास देण्यात आला आहे. या कामाचा अंदाजित खर्च २३ कोटी रुपये अपेक्षित आहे. प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम १५ महिन्यात पूर्ण करण्याचा नासुप्रचा मानस आहे. ही इमारत एकूण सात माळ्याची असून सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. या इमारतीच्या चारही बाजूला लॅण्ड स्केपिंग, हिरवळ व वृक्ष लावण्याचे प्रस्तावित आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ ६३५९.८४ चौ.मी., तळघर व तळमजला ४०५५.४४ चौ.मी. क्षेत्रात पार्किंग असून ११२ कार, २२४ स्कुटर व २२४ सायकली पार्क होऊ शकतील. पहिला ते पाचवा माळा प्रत्येकी ९१२ चौ.मी. क्षेत्रात कार्यालय. सहाव्या माळ्यावर कॉन्फरन्स हॉल व १५० क्षमतेचे आॅडिटोरियम असे एकूण १०३० चौ.मी. क्षेत्र. ही प्रशासकीय इमारत नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यालय असून या कार्यालयातून नागपूर मेट्रो रेल्वेची महत्त्वपूर्ण कामे करण्यात येतील.

Web Title: Metro trains get momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.