मेट्रोची कुदळ पुढील आठवड्यात

By Admin | Updated: May 7, 2017 03:32 IST2017-05-07T03:32:14+5:302017-05-07T03:32:14+5:30

पुण्याचा चेहरा बदलणाऱ्या पुणे मेट्रोच्या कामाला पुढील आठवड्यात प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गाचे

Metro spade next week | मेट्रोची कुदळ पुढील आठवड्यात

मेट्रोची कुदळ पुढील आठवड्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्याचा चेहरा बदलणाऱ्या पुणे मेट्रोच्या कामाला पुढील आठवड्यात प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गाचे ४९९ कोटी रुपयांचे काम हैदराबाद येथील नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी (एनसीसी) यांना मिळाले असून त्यांना कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे.
या कामासाठी एकूण चार कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. त्यात एनसीसी कंपनीची निविदा सर्वाधिक कमी किमतीची होती. त्यामुळे ती मंजूर करण्यात आली. महामेट्रो कंपनीचे नागपूर मेट्रोचे कामही याच कंपनीकडे आहे. पुण्याचे कामही त्यांनाच मिळाले आहे. महामेट्रोने त्यांना पुण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेशही दिला असून पुढील आठवड्यातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यादृष्टीने कंपनीच्या वतीने या मार्गाची पाहणी करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
मेट्रो मार्गाचे उंच खांब तयार करण्याचे काम प्रत्यक्ष रस्त्यावर होणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या मध्यभागाची पाहणी मेट्रोने तज्ज्ञांकडून पूर्ण केली आहे. काम सुरू होताना रस्त्याच्या मध्यभागातून दोन्ही बाजूंना सारख्या अंतरावर बॅरिकेडस् लावण्यात येणार आहेत. महामेट्रोच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे मेट्रोच्या कामासाठी म्हणून जागेची मागणी करण्यात आली आहे.
खांब तयार करण्याचे काम रस्त्यावर होणार असले तरी त्यावरच्या मेट्रो मार्गाचे प्रचंड आकाराचे सिमेंटचे ब्लॉक्स मात्र प्रीबिल्ट म्हणजे कार्यशाळेत तयार करून नंतर वर बसवण्यात येणार आहेत. या कार्यशाळेसाठी म्हणून महामेट्रोला जागा हवी आहे. ठेकेदार कंपनीला ३ वर्षांसाठी म्हणून ही जागा कराराने देण्यात येईल.
वनाज ते रामवाडी हा मार्ग मेट्रोसाठी कामाच्या दृष्टीने सर्वात आव्हानात्मक समजला जातो. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या मार्गाची निविदा एकत्र असली तरी हे काम टप्पे तयार करून करण्यात येणार आहे. दीक्षित यांनी सांगितले, की प्रत्येकी २५० मीटरचा एक टप्पा याप्रमाणे हे काम होईल.
जिथे काम सुरू आहे त्या जागेवरचे वाहनतळ व अन्य
कायदेशीर बाबी पुढच्या २५० मीटरमध्ये किंवा रस्त्याला जोडून असलेल्या गल्ल्यांमध्ये हलवण्यात येईल. सुरू असलेले काम पूर्ण
झाले, की पुढच्या २५० मीटरचे काम सुरू होईल, याच पद्धतीने संपूर्ण मार्गाचे काम होईल. नागरिक, वाहनधारक, तसेच मालमत्ताधारक यांना कमीत कमी त्रास होईल,
याची काळजी घेण्याची सूचना ठेकेदार कंपनीला करण्यात आली आहे, असे दीक्षित म्हणाले.

प्रत्यक्ष कामाला प्रथमच होणार सुरूवात

पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स हा मार्ग सुमारे १०.७५ किलोमीटर लांबीचा आहे. संपूर्ण मार्ग उन्नत (इलेव्हिटेड) आहे. मेट्रोच्या एकूण ३१ किलोमीटरमधील
हे पहिलेच काम आता प्रत्यक्ष सुरू होत आहे.
दीक्षित यांनी सांगितले, की पुढच्याच आठवड्यात काम सुरू करण्यासंबंधी कंपनीला कळवण्यात आले आहे.
महामेट्रो कंपनीने मेट्रोच्या ३१ किलोमीटर मार्गाचे वेगवेगळे टप्पे केले आहेत. त्यानुसार निविदा प्रसिद्ध करण्यात येतील. त्याप्रमाणे आता वनाज ते शिवाजीनगर या मार्गाचीही निविदा प्रसिद्ध होणार आहे.
स्वारगेटपर्यंत हा मार्ग उन्नत असून स्वारगेट ते जिल्हा न्यायालय हा मार्ग मात्र भुयारी आहे. त्याची स्वतंत्र निविदा काढण्यात येईल.


मेट्रो कार्ड पुण्यातही
नागपूर येथे महामेट्रोच्या वतीने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वतीने एक विशेष स्मार्ट कार्ड जारी करण्यात येणार आहे. या कार्डमुळे नागरिकांना मेट्रोशिवायची सार्वजनिक प्रवासी वाहतूक किंवा अन्य काही खरेदीसाठी रोख पैसे द्यावे लागणार नाहीत. पुण्यातही असे कार्ड देण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये आहे तशीच तसेच मेट्रोच्या एका डब्याची प्रतिकृती पुण्यातही उभी करण्यात येणार असून त्यासाठी संभाजी उद्यानमधील जागा महापालिकेकडे मागण्यात आली आहे.
- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या रस्त्यावरील कोणत्याही अधिकृत मालमत्तेला कसलाही धक्का लागणार नाही, याची ग्वाही दीक्षित यांनी दिली. मेट्रो संवाद कार्यक्रमातून याची कल्पना पुणेकरांना दिली आहे,
असे ते म्हणाले.
मेट्रोच्या कामासंबंधी प्रत्येक पुणेकराला माहिती असावी, असाच महामेट्रोचा
हेतू आहे. प्रत्येक नागरिकाला काम कसे होणार, कधी होणार, त्यामुळे कोणाचे नुकसान होणार आहे का, याची परिपूर्ण माहिती असलेले सार्वजनिक स्वरूपाचे हे पहिलेच काम असेल, असा दावा दीक्षित यांनी केला.

Web Title: Metro spade next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.