मेट्रोची ‘स्मार्ट’ भरारी
By Admin | Updated: July 14, 2014 03:17 IST2014-07-14T03:17:58+5:302014-07-14T03:17:58+5:30
मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत येताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या मेट्रोची नवीन भाडेवाढ जुलै महिन्यात लागू

मेट्रोची ‘स्मार्ट’ भरारी
मुंबई : मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत येताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या मेट्रोची नवीन भाडेवाढ जुलै महिन्यात लागू झाल्यानंतर आणि यामध्येही स्मार्ट कार्डद्वारे प्रवास स्वस्त केल्याने मेट्रो प्रवाशांनी स्मार्ट कार्डलाच अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. नवीन भाडेवाढ लागू होताच पाच दिवसांत तब्बल ३0 हजार स्मार्ट कार्डची विक्री झाली आहे.
मुंबईकरांच्या पसंतीस मेट्रो उतरावी यासाठी एक महिना त्याचे भाडे १0 रुपये ठेवले. मात्र मेट्रो सुरू होण्यापूर्वीच भाडे ठरवण्यावरून राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वाद रंगला. भाडेदराचा वाद न्यायालयात असल्याने मेट्रोचे नवीन पण अल्प भाडे ८ जुलैपासून लागू केले. वर्सोवा ते घाटकोपर कमीतकमी भाडे १0 रुपये आणि जास्तीतजास्त भाडे २0 रुपये आकारणी करण्याचा निर्णय झाला. टोकन काढून प्रवास केल्यास वर्सोवा ते घाटकोपर प्रवासासाठी २0 रुपये मोजावे लागत आहेत. तर स्मार्ट कार्ड काढून प्रवास केल्यास १५ रुपये भाडे आकारणी होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्मार्ट कार्डलाच जास्त पसंती दिली आहे. ८ जुलैपासून भाडे लागू होताच आतापर्यंत ३0 हजार स्मार्ट कार्डची विक्री झाली आहे. मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून मेट्रोच्या पहिल्या वर्षात स्मार्ट कार्डची ७0 टक्के विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र आतापर्यंत ५0 टक्के विक्री झाल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्ताने सांगितले. मेट्रो सुरू होताच पहिल्या महिन्यापासून प्रत्येक दिवशी सरासरी ४ हजार स्मार्ट कार्डची विक्री होत आहे. आतापर्यंत २ लाख २५ हजार स्मार्ट कार्डची विक्री झाली आहे. (प्रतिनिधी)