मेट्रो आली, खड्ड्यांचे काय?
By Admin | Updated: August 25, 2014 01:21 IST2014-08-25T01:21:32+5:302014-08-25T01:21:32+5:30
लोकल नागपूरला ग्लोबल करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मेट्रो आल्याने नागपूरच्या विकासाची गाडी सुपरफास्ट होणार आहे. ‘एम्स’ ही आता उपराजधानीतच ! विकासाच्या या पर्वात नागपूर

मेट्रो आली, खड्ड्यांचे काय?
ग्लोबल नागपूरचा लोकल चेहरा : कशी धावणार विकासाची गाडी ?
नागपूर : लोकल नागपूरला ग्लोबल करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मेट्रो आल्याने नागपूरच्या विकासाची गाडी सुपरफास्ट होणार आहे. ‘एम्स’ ही आता उपराजधानीतच ! विकासाच्या या पर्वात नागपूर खड्ड्यांची राजधानी होत तर नाही ना ! शहरातील खड्ड्याची स्थिती आणि राज्यकर्त्यांचे होत असलेले दुर्लक्ष विचारात घेत आता आंदोलक संघटना आणि राजकीय पक्षांनी खड्ड्यांना महापालिका पदाधिकाऱ्यांचे नाव दिले आहे. शहरातील खड्डे महापालिकेच्या रस्त्यावर नसून ते नासुप्रच्या रस्त्यावरील आहे, असा दावा मनपाचे पदाधिकारी करीत आहे. खड्डे हे कुणाचेच नसतात. त्याचा फटका जनसामान्यांना बसतो. प्रसंगी एखाद्याचा जीव जातो. याचा विसर ग्लोबल नागपूरचा संकल्प घेणाऱ्या राज्यकर्त्यांना नक्कीच झालेला दिसतो. (लोकमत चमू)
खड्ड्यातून ग्रीन बस धावणार?
प्रदूषणमुक्त इथेनॉलवरील ग्रीन बसचे शुक्रवारी थाटात लोकार्पण झाले. शहरातील वाहनांची संख्या १५ लाखांवर गेली आहे. त्यात दररोज नव्याने भर पडत आहे. चांगली बससेवा नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी शहरात २०० ग्रीन बसेस धावणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु खड्ड्यांच्या मार्गावरून ही संवेदनशील बसकशी धावणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. रस्ते दुरुस्त झाल्यानंतरच इथेनॉलवरील बसेस चालविणे शक्य होईल.
भाजप कार्यालयापुढेच खड्डा
धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात नेत्यांच्या बैठका होतात. या कार्यालयासमोरच्या मार्गावर काही महिन्यांपासून खड्डा पडलेला आहे. पंचशील टॉकीज ते धंतोली पोलीस स्टेशन दरम्यानच्या वर्दळीच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. पोलीस स्टेशनच्या बाजूलाही खड्डे आहेत. लोहापुलाजवळ धंतोली झोनच्या कार्यालयासमोरील मार्गावर खड्डे आहेत. त्यात मुरुम टाकण्यात आला होता. परंतु पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत.