पाथर्डीत कडकडीत बंद
By Admin | Updated: September 27, 2016 02:06 IST2016-09-27T02:06:10+5:302016-09-27T02:06:10+5:30
मोहरी येथील गतिमंद व अपंग अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याच्या निषेधार्थ सोमवारी पाथर्डीत कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयावर

पाथर्डीत कडकडीत बंद
पाथर्डी (जि. अहमदनगर) : मोहरी येथील गतिमंद व अपंग अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याच्या निषेधार्थ सोमवारी पाथर्डीत कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
मोर्चेकऱ्यांच्या वतीने पाच शाळकरी विद्यार्थिनींनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर माणिकदौंडी चौकात वसंतदादा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरोपीला कडक शासन करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला. शेकडो सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार करीत खडे बोल सुनावले.
रविवारी दुपारी मोहरीतील गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. त्याबाबत पीडित मुलीचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपीच्या मुलाने व नातेवाइकांनी आमच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असे पीडित कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या धमकी व घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी आंबेडकर चौकापासून मूक मोर्चा निघाला. मोर्चाच्या अग्रभागी शाळकरी विद्यार्थिनी होत्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे यांच्याशी मोर्चेकऱ्यांनी चर्चा केली. (प्रतिनिधी)
आरोपीला कोठडी
- पाथर्डी पोलिसांनी सोमवारी आरोपी अशोक सदाशिव वाल्हेकर याला न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड़ सतीश पाटील यांनी युक्तिवाद केला़ ते म्हणाले, आरोपीची पूर्ण चौकशी करायची असून, घटनेत आणखी कुणाचा समावेश आहे त्याचाही पोलिसांना शोध घ्यायचा आहे. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
पीडित मुलीवर उपचार
पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे़ सोमवारी शिवसेना नेत्या आ़ नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन मुलीच्या प्रकृ तीविषयी माहिती घेतली.