सत्ताधाऱ्यांची धर्मकारणाला मूकसंमती असल्याचा संदेश

By Admin | Updated: November 21, 2015 02:51 IST2015-11-21T02:51:14+5:302015-11-21T02:51:14+5:30

साहित्यिक-कलावंतांना आत्ताच असहिष्णुता कशी आठवली? याबद्दल ‘पुरस्कार वापसी’च्या कृतीवर टीका करणारे सत्ताधारी विचारणा करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, अत्याचाराच्या

Message of ruling for peace of the people | सत्ताधाऱ्यांची धर्मकारणाला मूकसंमती असल्याचा संदेश

सत्ताधाऱ्यांची धर्मकारणाला मूकसंमती असल्याचा संदेश

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर , साहित्य नगरी

साहित्यिक-कलावंतांना आत्ताच असहिष्णुता कशी आठवली? याबद्दल ‘पुरस्कार वापसी’च्या कृतीवर टीका करणारे सत्ताधारी विचारणा करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, अत्याचाराच्या घटनांना धर्मकारणाचा आधार देऊन त्यांचे समर्थन करण्यात येत आहे. त्या समर्थनाला आवर घालण्याचा किंचितही प्रयत्न सत्ताधारी करताना दिसत नाहीत, ही खेदाची बाब आहे. यामुळे साहित्यिक, कलावंत आणि विचारवंतांन कधीही न जाणवलेली भीती वाटत आहे. सत्ताधाऱ्यांच्या निमूट राहण्यातून त्यांची या धर्मकारणाला मूकसंमती आहे, असाच संदेश सगळीकडे जातअसल्याची परखड टीका
१६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत पवार यांनी केली.
रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत दिमाखात करण्यात आले.
या प्रसंगी, मावळते संमेलनाध्यक्ष कवी अशोक नायगावकर यांनी संमेलनाच्या प्रतीकात्मक पालखीची धुरा संमेलनाध्यक्ष जयंत पवार यांच्या खांद्यावर सोपविली. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, प्रा.एल.बी. पाटील, मुख्य समन्वयक शशीकांत तिरोडकर, संमेलन समिती प्रमुख रवींद्र आवटी, व्यावसायिक सुरेश हावरे, माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे, सारस्वत बँकेचे संचालक किशोर रांगणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आजची परिस्थिती लिहिणाऱ्यांसाठी, व्यक्त होऊ पाहणाऱ्यांसाठी अतिशय चिंताजनक बनली आहे. देशातील या परिस्थितीचा निषेध म्हणून काही साहित्यिकांनी आपले पुरस्कार शासनाला परत केले. त्यांची ही कृती महत्त्वाची आहे. पण तिच्यामागचा हेतू सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो हेतूच दूषित करुन सर्वांच्या मनात गोंधळ उडवून दिला जात असल्याचे संमेलनाध्यक्ष पवार यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी साहित्यिक-कलावंतांना भयमुक्त वातावरण द्यावे, एवढीच साहित्य विश्वाची अपेक्षा आहे. हे वातावरण निर्माण होण्यात आडकाठी आणणाऱ्या घटकांवर अंकुश ठेवावा, अशी माफक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर लेखकांनी आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत वास्तवाचे भान वाचकाला आणून द्यावे आणि त्याचा विवेक जागवावा, अशी सूचनाही पवार यांनी साहित्यिकांना केली. (प्रतिनिधी)

विचारांची चर्चा होणे हे जागरूकपणाचे लक्षण - मुख्यमंत्री
देशाची प्रगतीकडे वाटचाल होत असताना, वेगवेगळ्या विचारांची चर्चा होणे हे जागरूकपणाचे लक्षण आहे. टीका करणे हे तर आपल्या रक्तातच असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केले.
देशाच्या संस्कृतीत, सहिष्णुतेत सगळ््या विचारांना सामावून घेण्याची ताकद आहे. असे सांगताना त्यांनी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा आवर्जून उल्लेख केला. विविध विचारांसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे हे व्यासपीठ एक उत्तम असल्याचेही ते म्हणाले. कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित प्रबोधनकार ठाकरे व्यासपीठावर कोमसाप साहित्यमित्र पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

आज निवडक विचार करण्याची वेळ नाही. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, किंबहुना हा अधिकार त्यांच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. त्या विचारांवर विचारमंथन होणे हीच काळाची गरज आहे. त्यातून मग कोणाच्याही चांगल्या गोष्टी स्वीकारुन वाईट गोष्टींवर टीका केली पाहिजे. आज जगभरातील सर्वात तरुण देश म्हणून आपली ओळख आहे. देशाची ५० टक्के लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे. ही लोकसंख्या मानव संसाधनामध्ये रुपांतरीत होणार आहे. हीच आपली विकासाची वाटचाल ठरू शकेल. या वाटचालीसाठी साहित्यिक आणि विचारवंतांवरही मोठी जबाबदारी आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: Message of ruling for peace of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.