पॅथॉलिजिस्टबद्दल डीएमईआरचा गोंधळ
By Admin | Updated: April 6, 2015 04:21 IST2015-04-06T04:21:36+5:302015-04-06T04:21:36+5:30
राज्यात अनेक ठिकाणी हजारो पॅथॉलॉजी लॅब बोगस पॅथॉलॉजिस्ट चालवत असल्याने निदानाचा काळा बाजार होतो. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवाशी

पॅथॉलिजिस्टबद्दल डीएमईआरचा गोंधळ
पूजा दामले, मुंबई
राज्यात अनेक ठिकाणी हजारो पॅथॉलॉजी लॅब बोगस पॅथॉलॉजिस्ट चालवत असल्याने निदानाचा काळा बाजार होतो. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवाशी खेळ चालल्याचे समोर आले आहे. बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला गेला होता. पण, पॅथॉलॉजी लॅब या वैद्यकीय व्यवसायात मोडतात की पॅरावैद्यकीय व्यवसायात याचाच घोळात घोळ वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक (डीएमईआर) डॉ. प्रवीण शिनगारे घालत असल्याचे उघड झाले आहे.
पॅथॉलॉजी लॅब या वैद्यकीय व्यवसायात समाविष्ट नसून त्या पॅरावैद्यकीय व्यवसायात मोडतात, असे अजब तर्कट डॉ. शिनगारे यांनी मांडले. त्यामुळे बोगस डॉक्टर म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. ज्या व्यक्तींची नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदकडे नाही, पण ते स्वत:च्या नावासमोर डॉक्टर असे लावून दवाखान्याचा बोर्ड देखील लावतात, त्यांच्यावरच बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करता येऊ शकते, असेही ते म्हणाले. पॅथॉलॉजी लॅब हा वैद्यकीय व्यवसाय आहे की नाही? असा प्रश्न महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेस विचारला असता. परिषदेचे डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी ‘पॅथॉलॉजी लॅब हा वैद्यकीय व्यवसायच आहे’, असे ‘लोकमत’ला सांगितले. पॅथॉलॉजी लॅबमध्ये एमडी पॅथॉलॉजिस्ट टेक्निशियनना कामासाठी ठेवतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टने पॅथॉलॉजी लॅब हा वैद्यकीय व्यवसाय आहे की नाही? असा प्रश्न डीएमईआरला विचारला होता. तेव्हा हा विषय आमच्या अख्यारित येत नाही. या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद देईल, असे सांगून त्यांनी हाथ वर केले. यानंतर असोसिएशनने परिषदेला प्रश्न विचारल्यावर त्यांनी पॅथॉलॉजी हा वैद्यकीय व्यवसायच आहे, असे लेखी स्वरूपात दिले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी ‘लोकमत’ दिली.