मुंबईचा पारा @ ३५.२
By Admin | Updated: October 20, 2016 01:56 IST2016-10-20T01:56:12+5:302016-10-20T01:56:12+5:30
आॅक्टोबर हीटचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच आहे.

मुंबईचा पारा @ ३५.२
मुंबई : आॅक्टोबर हीटचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी, मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. मान्सूनच्या परतीनंतर २७ अंशावर घसरलेले कमाल तापमान ३५ अंशावर पोहोचले आहे. बुधवारी शहराचे कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, आठवडाभर कमाल तापमानाचा आलेख चढाच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ४ ते ५ दिवसांत नैऋत्य मौसमी पाऊस देशाच्या उर्वरित भागातून परतण्यासाठी स्थिती अनुकूल आहे. मागील चोवीस तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले असून, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
मुंबईच्या कमाल तापमानात मागील तीन दिवसांपासून सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. गणेशोत्सवासह नवरात्रौत्सवात पडलेल्या पावसामुळे, शहराचे कमाल तापमान २७ अंशावर घसरले होते. मात्र, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येऊ लागली. ३२, ३३ आणि ३४ अंशापर्यंत मजल मारलेल्या कमाल तापमानाने बुधवारी थेट ३५ अंशाचा पारा गाठला. विशेषत: सोमवारच्या ढगाळ वातावरणानंतर हवामानात झालेल्या बदलाने मुंबई आणखी तापली आणि वाढत्या आॅक्टोबर हीटने मुंबईकर घामाघूम झाल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)
>राज्यासाठी अंदाज
२० आॅक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
२१-२२ आॅक्टोबर : दक्षिण कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
२३ आॅक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
मुंबईसाठी अंदाज
२०-२१ आॅक्टोबर : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २४ अंशाच्या आसपास राहील.