मुंबई/पुणे : अवघा महाराष्ट्र थंडीच्या लाटेने गारठला आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील उगाव येथे पारा शून्यावर पोहोचला होता. नागपुरातील तापमान किंचीत वाढून ४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर मुंबई शहर आणि उपनगरातील गारठा रविवारीही कायम आहे. रविवारी मुंबईचे किमान तापमान १५.६ अंश नोंदविण्यात आले आहे. थंडीची ही लाट अजून दोन दिवस कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागत करताना साथीला बोचरा गारठा असेल.उत्तर भारतातील अनेक राज्यात थंडीची लाट आली असून त्यात अनेक शहरे धुक्यात गुरफटून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळ होताच थंडगार वारे वाहू लागत असल्याने बोचरी थंडी जाणवते़ त्यामुळे रात्रीच्या गर्दीची ठिकाणे सध्या ओस पडलेली दिसत आहेत़ अशीच परिस्थिती विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्रात दिसून येते. मराठवाड्यातही कडाका वाढला असून परभणीत ३.३ तापमान होते. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह पुण्यातही झोंबणाऱ्या वाºयामुळे गारठ्याची तीव्रता चांगलीच जाणवत आहे.बुलडाणा जिल्ह्यात कमालीचा पारा घसरल्याने मका व हळद पिकाने हिरवा शालू पांघरुन नटलेले असे हिरवेकच्च रानं एका दिवसात पिवळे पडल्याचे चित्र बहुतांश भागात पाहवयास मिळत आहे.३१ डिसेंबरला विदर्भाच्या काही भागात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे़ मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीची लाट असणार आहे़ १ जानेवारीला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे़ २ व ३ जानेवारीला विदर्भात काही भागात थंडीची लाट येईल. तर सोमवारसह मंगळवारीही मुंबईचे किमान तापमान १६ ते १८ अंशांवर राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.३१ डिसेंबर आणि १ जानेवारीधुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील काही भागात या दोन्ही दिवशी थंडीची लाट असणार आहे़ही शहरे गारठली : अहमदनगर ४़५, अकोला ५़९, अमरावती ८़४, औरंगाबाद ६़८, बुलडाणा ७़५, चंद्रपूर ८़२, गोंदिया ५़२, जळगाव ६़६, महाबळेश्वर १०़२, मालेगाव ७, नाशिक ७, नागपूर ४, नांदेड ७, उस्मानाबाद ८़९, परभणी ६़६, पुणे ६, सांगली १०़४, सातारा ९़४, सोलापूर १०़४, वर्धा ७़५, यवतमाळ ९़४़
नाशिक जिल्ह्यात पारा शून्यावर; नववर्षाच्या स्वागताला मुंबईत गारठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 03:06 IST