१६ जिल्ह्यांत पारा चाळीशीपार
By Admin | Updated: April 29, 2017 02:18 IST2017-04-29T02:18:26+5:302017-04-29T02:18:26+5:30
राज्यातील तापमान पुन्हा वाढू लागले आहे. शुक्रवारी १६ जिल्ह्यातील तापमान चाळीस अंशाच्या पुढे होते. सोलापूर शहर

१६ जिल्ह्यांत पारा चाळीशीपार
पुणे/सोलापूर : राज्यातील तापमान पुन्हा वाढू लागले आहे. शुक्रवारी १६ जिल्ह्यातील तापमान चाळीस अंशाच्या पुढे होते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वळीवाचा पाऊस झाला. या पावसामुळे सुखद गारवा आल्याने सोलापूरकरांना तात्परता दिलासा मिळाला आहे. पुढील तीन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली.
उष्णतेच्या लाटेपासून सुटका झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून पारा सरासरीच्या आसपास होता. परंतु दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील बहुतांश ठिकाणचे तापमान ४० अंशाच्या वर आहे. त्यामानाने मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तेवढा कडाका नाही. पुण्यातील कमाल तापमान ३८.७ अंश सेल्सिअस असून, किमान तापमान २०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
अहमदनगर येथील कमाल तापमान ४१.२, जळगाव ४१.६, मालेगाव ४२, सांगली ४०, सोलापूर ४२, परभणी ४१.४, नांदेड ४०, बीड ४१.६, अकोला ४२.२, अमरावती ४०.८, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४२.५, नागपूर ४३.५, वाशिम ४०, वर्धा ४३ आणि यवतमाळ येथील तापमानाचा पारा ४०.५ अंश सेल्सिअस होता. तर, औरंगाबाद ३९, सातारा ३८.६, नाशिक ३८.१, महाबळेश्वर ३४ आणि कोल्हापूरातील तापमान ३८.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)