लैंगिक छळ टाळण्यासाठी सीनिअर्सला केले मेन्टॉर
By Admin | Updated: June 23, 2014 04:10 IST2014-06-23T04:10:57+5:302014-06-23T04:10:57+5:30
हे प्रकरण एकाही विद्यार्थिनीने मला, इतर प्राध्यापक, महिला कर्मचारी किंवा त्यांच्या कोणत्याही सीनिअर्सना कधीच सांगितले नाही

लैंगिक छळ टाळण्यासाठी सीनिअर्सला केले मेन्टॉर
स्नेहा पावसकर, ठाणे
महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनींच्या प्रदीर्घकाळ झालेल्या लैंगिक छळाला अधिष्ठाता डॉ. चोइती मैत्रा व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेला विश्वास, संवादाचा अभाव तसेच मैत्रा यांची बेपर्वाई ही मुख्य कारणे असल्याचे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मैत्रा यांच्याशी ‘लोकमत’ने केलेल्या चर्चेतून स्पष्ट झाले असून, अजब बाब म्हणजे असे प्रकार घडू नयेत यासाठी सीनिअर विद्यार्थ्यांनाच मेन्टर म्हणून नेमण्याचा अजब आदेश अधिष्ठात्यांनी काढला.
हे प्रकरण एकाही विद्यार्थिनीने मला, इतर प्राध्यापक, महिला कर्मचारी किंवा त्यांच्या कोणत्याही सीनिअर्सना कधीच सांगितले नाही. ही बाब आमच्यापर्यंत आलीच नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ विद्यार्थिनी आणि आपल्यात पुरेसा विश्वास आणि सुसंवाद नव्हता असा होत नाही का, या प्रश्नावर त्या निरुत्तर झाल्या. मेडिकलच्या अॅडमिशनचे कोर्स पूर्ण करून आयुष्याचे सोने करण्याच्या अपेक्षेचे मोठे ओझे विद्यार्थिनींच्या मनावर असते. असे प्रकार घडले तरी ते सांगितल्याने आपल्या शैक्षणिक कारकिर्दीवर त्याचा काही विपरित परिणाम होईल की काय, अशा भीतीची भर त्यात पडते. त्यामुळे त्यांच्यात आणि अधिष्ठाता, प्राध्यापकांत विश्वास आणि सुसंवाद असणे आवश्यक असते. परंतु इथे तो नसल्याने या विद्यार्थिनींना निनावी डरपोक स्टुडंट नावाच्या ई-मेलद्वारे महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे धाव घ्यावी लागली. परंतु महाविद्यालयात अधिष्ठाता या स्वत: महिला आहेत व महिला प्राध्यापकही सर्वाधिक आहेत. याशिवाय नर्सेस, इतर महिला कर्मचारी असताना त्यापैकी एकीच्याही लक्षात काही वर्षे राजरोस सुरू असलेला हा छळ कसा आला नाही, याचे कोणतेही उत्तर अधिष्ठाता अथवा त्यांच्या सहकारी प्राध्यापकांकडे नाही. मात्र डॉ. मैत्रा आणि त्यांचे इतर सहकारी हे मान्य करायला तयार नाहीत. प्रकरणातील आरोपी डॉ. शैलेश्वर नटराजन यांची इतर महिला कर्मचाऱ्यांशी असलेली वागणूक चांगली होती. असे असताना हा प्रकार घडलाच कसा? प्रकरण समोर आल्यावर मी स्वत: आश्चर्यचकित झाले असे त्यांनी सांगितले.