मानसिक स्थैर्यासाठी संतसाहित्य उत्तम
By Admin | Updated: November 9, 2014 00:02 IST2014-11-09T00:02:49+5:302014-11-09T00:02:49+5:30
सध्याचे जग हे स्पर्धेचे आहे, या चढाओढीत अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई सुरू आहे, यात प्रत्येकाचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.

मानसिक स्थैर्यासाठी संतसाहित्य उत्तम
पुणो : सध्याचे जग हे स्पर्धेचे आहे, या चढाओढीत अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई सुरू आहे, यात प्रत्येकाचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. मानसिक स्थैर्य मिळविण्यासाठी संतसाहित्य हा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच संचेती यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी विभागप्रमुख प्रा. अशोक कामत यांनी संपादित केलेल्या ‘निवडक सार्थ नामदेव’ या ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. गुरूकुल प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम कर्वे रस्त्यावरील स्वामी कृपा हॉल येथे पार पडला. याप्रसंगी संत नामदेव महाराजांचे विद्यमान वंशज ज्ञानेश्वर महाराज, ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे उपस्थित होते.
डॉ. संचेती म्हणाले, संत साहित्यामधून संतांनी संस्काराची शिकवण दिली. पिढ्यानपिढ्या संस्काराची मुल्ये बदलत गेली तरी मूळ तत्व बदलत नाही. ज्ञानातून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर शहाणपण असावे लागते तेच देण्याचा प्रयत्न संतांनी केला. आचार-विचार यांची सांगड घातली की संवेदनशीलता निर्माण होते, संतानी संतसाहित्यामधून ती संवेदनशीलता जागृत करण्याचे काम केले.
डॉ. कामत म्हणाले, साहित्यिक हे कधीच राजकारण्यांना शरण जात नाहीत तर ते समाज समृद्ध करण्याचे काम करतात. साहित्य हे खर्-या अर्थाने विचार देण्याचे नव्हेतर तर आचार देण्याचे व्यासपीठ आहे.
लवकरच सर्वसामान्यांची जिज्ञासापूर्ती करण्यासाठी आणि अभ्यासक व संशोधकांना विश्लेषण करण्यासाठी दोन ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. याच साहित्याने आचाराचे उत्तम देणो दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता पुणतांबेकर यांनी केले. (प्रतिनिधी)