मेहकरात बोगस डॉक्टरला अटक

By Admin | Updated: October 10, 2016 02:46 IST2016-10-10T02:46:23+5:302016-10-10T02:46:23+5:30

वैद्यकीय अधिकारी, पोलीस विभाग व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाची कारवाई.

Mehkrat bogas doctor arrested | मेहकरात बोगस डॉक्टरला अटक

मेहकरात बोगस डॉक्टरला अटक

मेहकर (जि. बुलडाणा), दि. 0९- येथील इमामवाडा परिसरामध्ये सुरू असलेल्या एका बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर ९ ऑक्टोबर रोजी धाड टाकून, त्याला अटक केली. ही कारवाई वैद्यकीय अधिकारी मेहकर, पोलीस विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाने केली.
शहरातील इमामवाडा परिसरामध्ये डॉ. बिकास गोपाल बिसवास (वय ४५) हा चांदसी दवाखाना उघडून रुग्णांवर उपचार करीत होता. त्याच्या दवाखान्यात बवासिर, मूळव्याध, भगंदर, फिशर, इसबगोल, एक्जीमा, कृप, कान फुटणे या सर्व आजारांवर डॉ.बिसवास इलाज करीत होता. दरम्यान, या डॉक्टरजवळ वैद्यकीय अर्हता व कायदेशीर मान्यता नसून, हा दवाखाना अवैधरीत्या सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती तुकाराम रावते ग्रामीण रुग्णालय मेहकर, ठाणेदार मोतीचंद राठोड, पोउनि गव्हाणे, पोकॉ सोनुने, शेख आरीफ, सानप, मंडळ अधिकारी रामराव चनखोरे, तलाठी पंजाबराव मेटांगळे आदींनी चांदसी दवाखान्यावर अचानक एकाचवेळी धाड टाकली. यावेळी डॉ. बिसवास वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. तसेच या दवाखान्यात अँलोपॅथीची औषधी आढळून आली. मात्र, त्याच्याजवळ अँलोपॅथीसंबंधी वैद्यकीय प्रमाणपत्र आढळून आले नाही. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने विहित केलेली कोणतीही शैक्षणिक अर्हता नसताना हा कथित डॉक्टर अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आल्याने, त्याच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी, अशी तक्रार डॉ. स्वाती रावते यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दाखल केली होती. (तालुका प्रतिनिधी)

मेहकर शहर व ग्रामीण भागामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. हे डॉक्टर गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळत असून, अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे.
-डॉ. स्वाती रावते
प्रभारी वैद्यकीय अधिकारी,
ग्रामीण रुग्णालय, मेहकर.

Web Title: Mehkrat bogas doctor arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.