मंत्री माणिकराव कोकाटे आणि संजय शिरसाट यांचे वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडली. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आता मंत्री मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकाला धमकी देतानाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओवरून रोहित पवार आणि मेघना बोर्डीकर यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर दौऱ्यावर असताना मेघना बोर्डीकर यांनी या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देत रोहित पवारांना टोला लगावला.
मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, "संबंधित गावातील ग्रामसेवकाविरोधात महिलांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. माझ्याजागी दुसरे कुणीही असते तरी त्याच भावना असत्या. मी स्वतः घडलेल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली. रोहित पवारांना हा व्हिडिओ नेमका कुणी पाठवला, याचाही त्यांनी खुलासा केला. सर्व ग्रामसेवक चुकीचे नाहीत, पण गावात एखाद्या नेत्याचा हस्तक्षेप किती असावा, हे स्थानिक लोकांनी ठरवायला हवे. सरकारच्या योजना लोकांसाठी असतात. पण गरजूंना योजनेचा लाभ मिळत नसेल तर, राग येणारच. रोहित पवार अर्धवट माहिती पसरवतात, त्यांना मोठा नेता बनण्याची घाई झाली आहे", असाही टोला मेघना बोर्डीकर यांनी लगावला.
“आमच्या मतदारसंघातील रोहित पवारांचे जुने मित्र आता अजितदादांकडे गेले आहेत, आणि त्यांनीच हा व्हिडिओ तयार करून रोहित पवारांना पाठवला आहे,” असा थेट आरोप करत मेघना बोर्डीकर यांनी केली. मेघना बोर्डीकर यांनी जरी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख थेट अजित पवार गटातील नेते विजय भांबळे यांच्याकडे होता.
रोहित पवार काय म्हणाले? मेघना बोर्डीकर यांचा व्हिडीओ पोस्ट करताना रोहित पवार म्हणाले की, "सभागृहात रम्मी खेळणारे…पैशांच्या बॅगा भरणारे… डान्सबार चालवणारे… आधी वाकडे काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे.. यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची... सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा..!"