मराठा समाजाच्या मागण्या विधानसभेत मांडू
By Admin | Updated: September 20, 2016 01:54 IST2016-09-20T01:54:18+5:302016-09-20T01:54:18+5:30
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधानसभेत आवाज उठवेन, अशी ग्वाही आमदार राहुल कुल यांनी दिली.

मराठा समाजाच्या मागण्या विधानसभेत मांडू
दौंड : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधानसभेत आवाज उठवेन, अशी ग्वाही आमदार राहुल कुल यांनी दिली. पुणे येथे रविवारी (दि. २५) होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासंदर्भात दौंड येथे झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
मराठा समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. मराठा आरक्षणाबरोबरच अन्य काही मागण्या आहेत. त्या सोडविणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन, असे राहुल कुल म्हणाले.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे म्हणाले, की मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. तेव्हा समाजाचा उद्रेक कधी होईल, याची शाश्वती नाही.
याचा विचार शासनाने करावा. या वेळी वासुदेव काळे, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, नंदू पवार, नामदेव ताकवणे, शरद सूर्यवंशी, अॅड. युवराज राजेभोसले, हरिश्चंद्र ठोंबरे, नितीन शितोळे, हनुमंत पाचपुते, राजू कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीपूर्वी शहारातील मुख्य रस्त्यावरून दुचाकींची मूक रॅली काढण्यात आली. शहरातील राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मूक रॅलीची सांगता बैठकीच्या ठिकाणी झाली. (वार्ताहर)
>परिणामी, मराठा समाजाच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा. आमचा लढा कुठल्याही जाती-धर्माशी नाही. परिणामी, भविष्यात कुठल्याही जाती-धर्माच्या व्यक्तीवर किंवा समाजावर अन्याय झाला, तर तो सहन केला जाणार नाही, असाही इशारा राजेंद्र कोंढरे यांनी दिला.