पंधरा मिनिटांत आटोपली सभा

By Admin | Updated: March 6, 2017 02:50 IST2017-03-06T02:50:02+5:302017-03-06T02:50:02+5:30

पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस, पीआरपी व रिपब्लिकन सेनेच्या महाआघाडीने घवघवीत यश प्राप्त केले

A meeting in 15 minutes | पंधरा मिनिटांत आटोपली सभा

पंधरा मिनिटांत आटोपली सभा


पनवेल : रायगड जिल्ह्यात पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस, पीआरपी व रिपब्लिकन सेनेच्या महाआघाडीने घवघवीत यश प्राप्त केले आहे. महाआघाडीच्या यशानिमित्त विजयी मिरवणूक व भव्य सत्कार शनिवारी आयोजित करण्यात आला होता. पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रॅलीला प्रारंभ झाला. सायंकाळी ७ वाजता मिरवणुकीचा समारोप खारघर येथील उत्सव चौकात होणार होता. मिरवणूक रात्री पावणेदहा वाजता खारघरमध्ये आली. खूप उशीर झाल्याने निव्वळ १५ मिनिटांत आयोजकांना सभा आटोपती घ्यावी लागली.
मिरवणुकीत राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, माजी नागराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस श्याम म्हात्रे, शेकापचे पनवेल तालुका चिटणीस नारायण घरत, राष्ट्रवादीचे पनवेल तालुका अध्यक्ष सुनील घरत, पनवेल शहर अध्यक्ष शिवदास कांबळे, काँग्रेसचे पनवेल शहर अध्यक्ष अ‍ॅड. के. एस. पाटील आदी, पीआरपीचे महाराष्ट्र सहसचिव नरेंद्र गायकवाड, रायगड जिल्हा अध्यक्ष सीताराम गोविंद कांबळे, रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड, अशोक गिरमकर, गुरुनाथ गायकर, मनोज शारिबन्द्रे, अजित अडसुळे, संजय घरत आदींसह शेकडोंच्या संख्येने मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली, खारघर या मार्गे रॅली खारघरच्या उत्सव चौकात आली. या ठिकाणी बाळाराम पाटील यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांचे सत्कार संपन्न झाले.
खारघर येथे ७ वाजता होणारी सभा रात्री १० वाजेपर्यंत पोहोचली. पोलिसांनी आयोजकांना सूचना दिल्या. अखेर माजी आमदार विवेक पाटील यांनी सभा आटोपती घेण्याच्या सूचना दिल्या व अगदी घाईघाईत आमदार बाळाराम पाटील व पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या सर्वच विजयी उमेदवारांचा सत्कार केला. (प्रतिनिधी)
महाआघाडीच्या विजयी उमेदवारांची पनवेल ते खारघर अशी मिरवणूक काढण्यात आली. मात्र, मिरवणूक मुळातच उशिराने सुरू झाली. सायंकाळी ७ नंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मात्र, पिक अवर्समुळे अनेक भागांत मोठी वाहतूककोंडी झाली. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे आदी ठिकाणी फिरून ही मिरवणूक खारघरमध्ये पोहोचली. मात्र, तोपर्यंत ९:४५ वाजले होते. पोलिसांनी वेळेबाबत सूचना दिल्याने महाआघाडीच्या नेत्यांनी विजयी उमेदवारांचा झटपट सत्कार करून सभा आटोपती घेतली.

Web Title: A meeting in 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.