मेडिकल अध्यापक निवृत्ती वय वाढले
By Admin | Updated: February 11, 2015 06:24 IST2015-02-11T06:24:26+5:302015-02-11T06:24:26+5:30
राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय, ३ दंत आणि ४ आयुर्वेदिक महाविद्यालयातील अध्यापकांचे नियत सेवानिवृत्तीचे वय ६३वरून ६४

मेडिकल अध्यापक निवृत्ती वय वाढले
मुंबई : राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय, ३ दंत आणि ४ आयुर्वेदिक महाविद्यालयातील अध्यापकांचे नियत सेवानिवृत्तीचे वय ६३वरून ६४ करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना अध्यापकांचा तुटवडा जाणवत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि आस्थापना मंडळामार्फत अध्यापकांची पदे भरण्यासाठी काही काळ लागणे अपरिहार्य आहे. तर अतिविशेषोपचार विषय व काही आरक्षित प्रवर्गांवर प्रयत्न करूनही पात्र उमेदवार उपलब्ध होत नाहीत. ही पदे रिक्त ठेवल्यास विद्यार्थी व रुग्णसेवा यावर विपरीत परिणाम होतो, ही बाब विचारात घेऊन अध्यापकांचे निवृत्ती वय वाढविण्यात आले आहे.
‘बांधकाम’च्या रोजंदार कर्मचाऱ्यांना सामावणार
सार्वजनिक बांधकाम विभागात रोजंदारीवर असलेल्या कमर्चाऱ्यांना पुणे येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयामध्ये नियमित स्वरूपात सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फायदा २६ कर्मचाऱ्यांना होईल. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असलेली विद्युत निरीक्षणालय शाखा ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली आणण्याचा निर्णयही घेण्यात आला.
नंदुरबार न्यायालयांसाठी १२ नवी पदे
नंदुरबार येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय व मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयांकरिता १२ नवीन पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या न्यायालयांची
कामे पूर्ण क्षमतेने सुरू होतील.
या नवीन पदांकरिता वेतन व भत्त्यासाठी सुमारे ६५ लाख ४० हजार तसेच न्यायालयाचे संगणकीकरण व इतर पायाभूत सुविधांसाठी सुमारे ६१ लाख ७६ हजार रुपये खर्चासही मान्यता देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)