मेडिकलचे निवासी डॉक्टर संपावर
By Admin | Updated: August 26, 2014 01:04 IST2014-08-26T01:04:48+5:302014-08-26T01:04:48+5:30
रुग्ण गंभीर असताना ईसीजी काढण्यास टाळटाळ केल्याच्या घटनेवरून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली. यात नातेवाईक-डॉक्टर दोघांमध्ये मारहाण झाल्याने तणावाचे

मेडिकलचे निवासी डॉक्टर संपावर
रुग्णसेवा प्रभावित : डॉक्टर-रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये मारहाण
नागपूर : रुग्ण गंभीर असताना ईसीजी काढण्यास टाळटाळ केल्याच्या घटनेवरून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली. यात नातेवाईक-डॉक्टर दोघांमध्ये मारहाण झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मेडिकलच्या अपघात विभागात घडली. या घटनेने संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने रात्री १ वाजतापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. अचानक पुकारण्यात आलेल्या या संपाने रुग्णसेवा प्रभावित झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नत्थूजी दुरडकर (७१) रा. ठाकरे ले-आऊट, मानेवाडा हा रुग्ण मेडिकलच्या अपघात विभागात रात्री ९.४५ वाजता आला. त्याच्या छातीत दुखत होते. डॉक्टरांनी त्याला तपासून ईसीजी काढण्यास सांगितले. परंतु रविवार सुटीचा दिवस असल्याने वॉर्ड क्र. २ नंबरच्या समोरील ईसीजी कक्ष बंद होता.
रुग्णाचे नातेवाईक परत डॉक्टरांकडे आले. डॉक्टरांनी त्यांना वॉर्ड क्र. २४ या अतिदक्षता विभागातून ‘ईसीजी’ काढण्यास सांगितले. तिथे गेल्यावर तेथील कर्मचाऱ्याने थांबायला सांगितले. परंतु १५ मिनिटे होऊनही आत बोलावले नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकाने पुन्हा कर्मचाऱ्याला विचारले, तेव्हा कर्मचाऱ्याने असभ्य भाषेचा वापर केला. याच वेळी कर्मचाऱ्याने ईसीजीचा रोल संपल्याचे सांगून थांबण्यास सांगितले. छातीत दुखत असलेल्या रुग्णाला उपचारासाठी वेळ लागत असल्याचे पाहत रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले. ते पुन्हा त्या संबंधित डॉक्टरांकडे गेले. परंतु डॉक्टरने ईसीजी नसल्याचे कारण पुढे करीत उपचार करण्यास टाळाटाळ केली. याच वेळी रुग्णाच्या एका पुरुष नातेवाईकाने डॉक्टरची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. डॉक्टराने आरडाओरड केली तेव्हा आजूबाजूचे डॉक्टर धावून आले. त्यांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकाला चांगलाच चोप दिला. याच वेळी पोलिसही आले. त्यांनी भांडण सोडवत जखमी नातेवाईकाची बाजू घेतली.
यामुळे संतप्त झालेल्या सर्व निवासी डॉक्टरांनी रात्री १२ वाजता अजनी पोलीस ठाण्यात जाऊन रुग्णाच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली; सोबतच डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी उचलून धरत रात्री १ वाजता बेमुदत संपाची घोषणा केली.
मेडिकल वाऱ्यावर
रविवारी रात्री अचानक निवासी डॉक्टर संपावर गेल्याने मेडिकल प्रशासनाची धावपळ उडाली. विशेष म्हणजे यावेळी एकाही वरिष्ठ डॉक्टराने मेडिकलला भेट दिली नाही. वॉर्डावॉर्डात डॉक्टर नव्हते. अपघात विभागासह संपूर्ण मेडिकल वाऱ्यावर होते.
सात रुग्णांचा मृत्यू
निवासी डॉक्टर शासकीय रुग्णालयाचा कणा असतो. परंतु रविवारी रात्रीपासून हेच डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. परिणामी सात रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारीही हा संप सुरू होता. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागावरही याचा परिणाम झाला. जिथे पाच निवासी डॉक्टर असायचे तिथे दोन वरिष्ठ डॉक्टर जबाबदारी सांभाळत होते. यामुळे रुग्णांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
विशेष म्हणजे सायंकाळपर्यंत फक्त १२८ रुग्णांनाच भरती करून घेण्यात आले. आज दिवसभरात १५ महत्त्वाच्या तर २६ किरकोळ शस्त्रक्रिया झाल्या. अनेक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याची माहिती आहे.
चौकशी समिती स्थापन
रविवारी मेडिकलच्या अपघात विभागात झालेल्या रुग्ण-डॉक्टरांमधील मारहाणप्रकरणी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.
औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. सहस्रभोजने यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत डॉ. संध्या बक्षी, डॉ. सोमलवार व डॉ. नंदू जयस्वाल यांचा समावेश आहे. उद्या, मंगळवारी सायंकाळपर्यंत समितीला आपला अहवाल सादर करायचा आहे.(प्रतिनिधी)
मारहाण आणि डांबून ठेवल्याचा आरोप
ट्रीटमेंट कार्डवर सही करण्यास नकार दिल्यामुळे डॉक्टरांनी आपल्या कक्षात डांबून ठेवले आणि मारहाण केली, अशी तक्रार मकरंद नत्थूजी दुरडकर (वय ३३) यांनी केली. त्यावरून अजनी पोलिसांनी मेडिकलच्या डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मकरंद याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, वडील नत्थूजी दुरडकर यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले होते. ईसीजी पेपर नसल्याने वाद झाला. यावेळी दुरडकर यांच्या नातेवाईकांनी कागदपत्रे डॉक्टरांना परत मागितली. डॉक्टरांनी ट्रीटमेंट कार्डवर सही करण्यास सांगितले. त्यांनी नकार देताच डॉक्टरांनी मकरंद यांना आपल्या कक्षात डांबून मारहाण केली. मकरंद यांच्या या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल केले. घटनेच्या वेळी कोणते डॉक्टर कर्तव्यावर होते, त्याची आता पोलीस चौकशी करीत आहेत. विशेष म्हणजे, डॉ. पवन पारसनाथ सिंग (वय २६) यांनी दुरडकर आणि त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याला मारहाण केल्याची अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी त्यावरून दुरडकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.
‘मार्ड’च्या मागण्या अशा आहेत
डॉक्टर सुरक्षा कायदा लागू करावा, सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करून १५० करावे, यात महिला सुरक्षा रक्षकांचाही समावेश असावा, अस्तित्वात असलेल्या सुरक्षा एजन्सीला बदलून माजी सैनिकांच्या सुरक्षा एजन्सीला याची जबाबदारी सोपवावी, अपघात विभागात एक्स-रे मशीन, ईसीजी व इतर आवश्यक यंत्रणा असाव्यात, पाच खाटांची रिकव्हरी रूम व्हेंटिलेटरसह उपलब्ध करून द्यावी, चतुर्थ कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, गेटपासची सोय उपलब्ध करावी व डॉक्टरांशी गैरवर्तणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.