मेडिकलचे वाचले ५० लाख

By Admin | Updated: October 6, 2014 00:53 IST2014-10-06T00:53:06+5:302014-10-06T00:53:06+5:30

शासकीय कामांमध्ये निधी हातात असेल तर, कर खर्च, असा नियम आहे. परंतु मेडिकल प्रशासनाने मंजूर निधीमधूनच ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामातील त्रुटी दूर करा, अन्यथा ताबा घेणार नाही, अशी भूमिका घेतली.

Medical reads 50 million | मेडिकलचे वाचले ५० लाख

मेडिकलचे वाचले ५० लाख

अधिष्ठात्यांचे प्रयत्न : संरक्षण भिंतीचे बांधकाम, मुख्य रस्त्याला जोडले ट्रामा सेंटर
नागपूर : शासकीय कामांमध्ये निधी हातात असेल तर, कर खर्च, असा नियम आहे. परंतु मेडिकल प्रशासनाने मंजूर निधीमधूनच ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामातील त्रुटी दूर करा, अन्यथा ताबा घेणार नाही, अशी भूमिका घेतली. परिणामी बांधकाम विभागाला त्रुटी दूर करण्यावाचून पर्याय उरलेला नाही. अधिष्ठात्यांच्या या प्रयत्नांमुळे तब्बल ५० लाखांचा निधी वाचल्याचे समजते.
उपराजधानीत वाढती लोकसंख्या आणि वाहनांमुळे अपघातांची संख्याही वाढत आहे. रस्ते, रेल्वे अपघातातील जखमी प्रवाशांना ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय सुविधा मिळाल्या तर त्यांचा जीव वाचू शकतो. हाच विचार करून मेडिकलमध्ये ट्रॉमा सेंटरला मंजुरी मिळाली. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत ६ हजार ८८० चौ.मी. जागेवर ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, बांधकामाच्या सुरुवातीलाच बांधकामात नियोजन नसल्याची बाब खुद्द ट्रामा केअर सेंटरच्या बांधकाम सदस्यांनी उघडकीस आणली. या समितीने तब्बल २३ बदल सुचविले. यामुळे ट्रामा केअरच्या नकाशात बरेच बदल झाले. त्याला मंजुरी मिळण्यातही वेळ गेला. मंजुरी नंतर बांधकामाला सुरुवात झाली. दीड वर्षानंतर ट्रामाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. बांधकाम विभाग १२ कोटी खर्चून बांधलेली इमारत मेडिकलकडे हस्तांतरित करणार होते. तशी प्रक्रियाही सुरू झाली होती. परंतु अधिष्ठाता डॉ. अभिमन्य निसवाडे यांनी पदभार सांभाळताच ट्रामातील अनेक त्रुटी बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिल्या. यात विशेषत्वाने संरक्षण भिंतीचा अभाव आणि मुख्य रस्त्यापासून ट्रामा सेंटर दूर असल्याचे त्यांनी उघडकीस आणले. जो पर्यंत ही कामे मंजूर निधीमधूनच पूर्ण होत नाही तोपर्यंत ताबा घेणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराशी चर्चा करून महिन्याभरात हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यात ट्रामाच्या परिसरात सौंदर्यीकरणही होणार आहे. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने साधारण ५० लाखांचा हा खर्च वाचल्याची चर्चा आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Medical reads 50 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.