मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप
By Admin | Updated: June 7, 2016 22:02 IST2016-06-07T21:47:35+5:302016-06-07T22:02:57+5:30
प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या येथील ह्यमेडिकलह्णच्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकाला बेदम चोप दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. ७ : प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या येथील ह्यमेडिकलह्णच्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकाला बेदम चोप दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. विद्यार्थिनींनी चोप देत प्राध्यापकाला अधिष्ठातांच्या कक्षापर्यंत नेले. हा प्रकार पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
सदर सहायक प्राध्यापकाकडे मनोविकृतीशास्त्र विभागाची जबाबदारी असून त्याने एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची शिबिरादरम्यान छेड काढली होती. सुरुवातीला या प्रकाराकडे सदर विद्यार्थिनीने दुर्लक्ष केले. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा प्राध्यापक पुन्हा स्त्रीरोग वार्डाकडे भटकायला आला. याची माहिती या विद्यार्थिनीने आपल्या सहकाऱ्यांना दिली. आठ ते दहा विद्यार्थिनींनी या सहायक प्राध्यापकाला पकडून चांगलाच चोप दिला. कॉलर पकडून विद्यार्थिनींनी प्राध्यापकाच्या कानशिलात लगावल्या. अचानक झालेल्या या प्रकाराने प्राध्यापक चांगलाच घाबरला. यानंतरही विद्यार्थिनींनी त्याला येथेच्छ चोप दिला.
बेदम मार खाऊन गलितगात्र झालेल्या या प्राध्यापकाला तशाच अवस्थेत मारहाण करीत अधिष्ठातांच्या कक्षाकडे आणण्यात आले. हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान या घटनेबाबत अधिष्ठाता आणि अधीक्षकाकडे विचारणा केली असता अशी कोणतीच तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले. तक्रार आल्यास विशाखा समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी सांगितले. सदर सहायक प्राध्यापकाविरोधात यापूर्वीसुद्धा तक्रारी होत्या. मात्र पुढे येण्यास कुणीही धाडस करीत नव्हते. परंतु मंगळवारी एका विद्यार्थिनीने धाडस दाखवून आपल्या सहकारी विद्यार्थिनीच्या मदतीने या मनोविकृतीशास्त्राच्या प्राध्यापकाचा चांगलाच समाचार घेतला. या बेदम धुलाईची दिवसभर वैद्यकीय महाविद्यालय परिसरात चर्चा होती. परंतु या प्रकरणात सदर प्राध्यापकावर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने केल्याचे सध्या तरी दिसत आहे.