वैद्यकीय प्रवेश; २५ लाखांची लूट
By Admin | Updated: August 23, 2015 00:04 IST2015-08-23T00:04:33+5:302015-08-23T00:04:33+5:30
लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली हैदराबादच्या एका विद्यार्थिनीच्या पालकाला २५ लाखांना

वैद्यकीय प्रवेश; २५ लाखांची लूट
अहमदनगर : लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली हैदराबादच्या एका विद्यार्थिनीच्या पालकाला २५ लाखांना लुबाडल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी ४ जणांच्या टोळीविरुद्ध लोणी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयांचे नाव वापरुन फसविणारे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हैदराबाद येथील एम. विजय भास्कर रेड्डी यांनी ‘लोकमत’कडे त्यांची कैफियत मांडली. प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांची २५ लाखांना फसवणूक झाली आहे. १७ आॅगस्टला त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.
मुलीच्या वैद्यकीय प्रवेशाच्या गडबडीत असताना २९ जुलैला रेड्डी यांना एक एसएमएस आला होता. सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील मोजक्या जागा शिल्लक आहेत, असे त्यात म्हटले होते. रेड्डी यांनी ३० जुलैला संबंधित मोबाईलवर संपर्क साधला.
दोन दिवसांनी सौरभ नाव सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या मुलीचा प्रवेश निश्चित झाल्याचे सांगितले. सौैरभने त्यांना प्रवरा मेडिकल महाविद्यालयात बोलाविले. ८ जुलैला सौरभने शैक्षणिक शुल्कापोटी रेड्डी यांना ५ लाख ४५ हजारांचा डिमांड ड्राफ्ट काढण्यास सांगितले. सोबतच व्यवस्थापनाला २५ लाख रोख द्यावे लागतील, असा निरोप दिला.
रेड्डी पुन्हा लोणी येथे आल्यानंतर सौरभने त्यांची आर. व्ही. पाटील यांच्याशी भेट घालून दिली व ते प्रवरा ट्रस्टचे सचिव असल्याचा दावा केला. १४ आॅगस्टला पाटीलने रेड्डी यांना वैद्यकीय प्रवेशपत्र सोपविले आणि त्यांच्याकडून रोख २५ लाख रुपये घेतले.
मात्र १७ आॅगस्टला रेड्डी यांनी महाविद्यालयात प्रवेशाचे पत्र दाखविल्यानंतर ते बनावट असल्याचे उघड झाले. रेड्डी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)
माझी कैफियत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातली आहे. स्थानिक पोलिसांना आरोपींची सीसीटीव्हीतील छायाचित्रे, मोबाईल क्रमांक दिले आहेत. मात्र मोबाईल बंद झाले आहेत.
- एम. विजय भास्कर रेड्डी,
तक्रारदार, हैदराबाद
रेड्डी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. मात्र, त्यांनी हैदराबादला गुन्हा दाखल करु, असे सांगितले होते.
- विनोद पाटील,
सहा. पोलीस निरीक्षक, लोणी
रेड्डी मला भेटले होते. त्यांची फसवणूक झाली आहे. प्रवेश प्रक्रियेची पूर्ण माहिती त्यांनी घेतली असती तर हे टळले असते. महाविद्यालय व्यवस्थापनाचा आरोपींशी संबंध नाही.
- प्राचार्य डी. एस. कुलकर्णी, प्रवरा वैद्यकीय महाविद्यालय, लोणी