चंद्रपूर मेडिकल कॉलेजसंदर्भात ‘एमसीआय’च्या नकारात्मक शिफारशी
By Admin | Updated: July 16, 2014 01:13 IST2014-07-16T01:13:49+5:302014-07-16T01:13:49+5:30
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने चंद्रपूर येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासंदर्भात केंद्र शासनाला नकारात्मक शिफारशी केल्या आहेत. यासह विविध बाबींमुळे महाविद्यालयात या वर्षीपासून

चंद्रपूर मेडिकल कॉलेजसंदर्भात ‘एमसीआय’च्या नकारात्मक शिफारशी
हायकोर्टात माहिती : आज पुढील सुनावणी
नागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने चंद्रपूर येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासंदर्भात केंद्र शासनाला नकारात्मक शिफारशी केल्या आहेत. यासह विविध बाबींमुळे महाविद्यालयात या वर्षीपासून प्रवेश देण्याच्या प्रयत्नांना यश मिळणे जवळपास अशक्य झाले आहे.
या प्रकरणावर आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, कौन्सिलचे वकील राहुल भांगडे यांनी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात केंद्र शासनाला नकारात्मक शिफारशी करण्यात आल्याचे सांगितले. परिणामी न्यायालयाने अन्य बाबी विचारात घेण्यासाठी उद्या, बुधवारी सुनावणी निश्चित केली.
महाविद्यालय व रुग्णालयासाठी १० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. कर्मचारी नियुक्ती व अन्य सुविधांसाठी निधी मिळाला आहे. महाविद्यालयाची स्वत:ची इमारत बांधण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. महिला व बाल रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे. ही इमारत तात्पुरती महाविद्यालयाला दिल्यास यावर्षीपासूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल ही बाब लक्षात घेता राहुल पुगलिया व रामदास वागदरकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)