एमसीए घडवणार गोलंदाज
By Admin | Updated: July 10, 2015 02:45 IST2015-07-10T02:45:22+5:302015-07-10T02:45:22+5:30
मुंबई क्रिकेटने आजवर अनेक प्रतिभावंत व जागतिक कीर्तीचे फलंदाज देशाला मिळवून दिले. त्या तुलनेत गोलंदाज मात्र खूपच कमी तयार झाले.

एमसीए घडवणार गोलंदाज
मुंबई : मुंबई क्रिकेटने आजवर अनेक प्रतिभावंत व जागतिक कीर्तीचे फलंदाज देशाला मिळवून दिले. त्या तुलनेत गोलंदाज मात्र खूपच कमी तयार झाले. मुळात भारतीय संघाच्या गोलंदाजीच्या मर्यादादेखील जगजाहीर आहे. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) गुरुवारी ‘बॉलिंग फाउंडेशन’ची स्थापना केल्याची घोषणा केली आणि याद्वारे मुंबई व भारतीय क्रिकेटला उत्कृष्ट वेगवान व फिरकी गोलंदाज मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी आॅस्टे्रलियाचे माजी मध्यमगती दिग्गज गोलंदाज जेफ थॉमसन यांंच्यावर नवोदितांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या उपक्रमातून मुंबईसाठी पुन्हा एकदा भरारी मिळवून देण्यास फायदा होणार असल्याचे सांगताना एमसीए उपाध्यक्ष व माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले की, या उपक्रमामध्ये युवा गोलंदाजांना केवळ थॉम्पसन यांचे मार्गदर्शन मिळणार नसून, देशांतर्गत स्पर्धेत मुंबईकडून चमकलेल्या अनुभवी गोलंदाजांचेदेखील मार्गदर्शन मिळेल. यामध्ये अॅबी कुरविल्ला, पारस म्हांबरे, साईराज बहुतुले यांसारख्या गोलंदाजांचा समावेश असेल. दरम्यान, यामध्ये फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी बहुतुले यांच्याकडे असेल. कोणताही सामना जिंकण्यास उत्कृष्ट गोलंदाज असणे गरजेचे असते. देशांतर्गत क्रिकेटमधील विविध वयोगटाच्या स्पर्धांमध्ये मुंबईला गुणवान गोलंदाज मिळवून देण्यास या उपक्रमाचा फायदा होईल, असेही वेंगसरकर यांनी सांगितले. १३ जुलैपासून सुरू होणारे हे प्रशिक्षण ३१ मे २०१७पर्यंत सुरू राहणार असून, एमसीएची निवड समिती १९ वर्षांवरील ३० वेगवान व ३० फिरकी गोलंदाजांची या शिबिरासाठी निवड करेल. तसेच हे शिबिर बांद्रा - कुर्ला संकुलातील शरद पवार बंदिस्त स्टेडियममध्ये पार पडेल.