राणीबाग मैदानासाठी महापौरांचे भाषण रोखले
By Admin | Updated: February 14, 2015 04:29 IST2015-02-14T04:29:17+5:302015-02-14T04:29:17+5:30
मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाने शुक्रवारी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागेत आयोजित केलेल्या उद्यानविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मनसेच्या

राणीबाग मैदानासाठी महापौरांचे भाषण रोखले
मुंबई : मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाने शुक्रवारी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागेत आयोजित केलेल्या उद्यानविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अध्यक्षीय भाषणास उभ्या राहिलेल्या महापौर स्नेहल आंबेकर यांना काळे झेंडे दाखवत मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. परिणामी महापौरांना भाषण सुरू करण्याआधीच थांबवावे लागले.
पालिकेने दरवर्षीप्रमाणे राणीबागेत झाडे, फुले, फळे आणि भाज्यांचे प्रदर्शन व उद्यान विद्याविषयक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यंदा प्रदर्शनाचे २० वे वर्ष असून, १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान तीन दिवस ते चालणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी महापौर या ठिकाणी आल्या होत्या. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महापौर मंचावर अध्यक्षीय भाषणास उभ्या राहिल्या आणि उपस्थित मनसे कार्यकर्त्यांनी ‘राणीबागचे मैदान परत द्या’ अशी घोषणाबाजी सुरू केली. या वेळी महापौरांना काळे झेंडे दाखवून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. याबाबत मनसेचे भायखळा उपविभाग अध्यक्ष विजय लिपारे म्हणाले, गेल्या कित्येक दिवसांपासून स्थानिकांना मैदान हवे असल्याची मागणी केली जात आहे. याबाबत नुकतीच विभागाध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम घेण्यात आली. सात हजारांहून अधिक स्थानिकांनी पार्किंग नको, तर खेळाचे मैदान हवे असल्याची मागणी सह्यांच्या माध्यमातून केली. मात्र महापौरांकडून प्रतिसाद मिळत नाही़ परिणामी निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवले जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)