महापौरपदासाठी रामाणे, भालकर यांचे अर्ज दाखल
By Admin | Updated: November 11, 2015 00:54 IST2015-11-11T00:53:29+5:302015-11-11T00:54:52+5:30
‘ताराराणी’तर्फे स्मिता मानेंचा अर्ज : शमा मुल्ला, संतोष गायकवाड, राजसिंह शेळके यांचे उपमहापौरपदासाठी अर्ज; कॉँग्रेसकडूनही आता चमत्काराची भाषा

महापौरपदासाठी रामाणे, भालकर यांचे अर्ज दाखल
कोल्हापूर : येत्या सोमवारी होत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे अपेक्षेप्रमाणे अश्विनी अमर रामाणे, तर भाजपतर्फे सविता शशिकांत भालकर यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. ताराराणी आघाडीच्या स्मिता मारुती माने यांनी मात्र ऐनवेळी महापौरपदासाठी आपला अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. उपमहापौरपदासाठी शमा सलीम मुल्ला (राष्ट्रवादी), संतोष बाळासो गायकवाड (भाजप), तर राजसिंह भगवानराव शेळके (ताराराणी आघाडी) यांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी केलेली घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने महानगरपालिकेचा विठ्ठल रामजी शिंदे चौक दणाणून गेला.
महापौरपदासाठी कॉँग्रेसने, तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने अनुक्रमे अश्विनी रामाणे व शमा मुल्ला यांचे अर्ज दाखल केले असले तर, भाजप व ताराराणी आघाडीने मात्र महापौर व उपमहापौर पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (पान १ वरून) राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली चर्चा सुरू असल्याने त्यांनी कदाचित भाजपचा महापौर नको अशी अट घालून ताराराणीला सहकार्य करायचे ठरविल्यास अडचण नको म्हणून ताराराणी आघाडीने दोन्ही पदांसाठी अर्ज भरले असल्याचे या आघाडीचे सुनील कदम यांनी पत्रकारांना सांगितले.
महापौर-उपमहापौर या पदांसाठी येत्या सोमवारी (दि. १६) जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होत आहे. त्यासाठी मंगळवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. दुपारी पावणेचार वाजता सर्वप्रथम भाजप व ताराराणी आघाडीचे उमेदवार चौकात पोहोचले. त्यांच्यासोबत भाजपचे महानगराध्यक्ष महेश जाधव, ‘ताराराणी’चे सुनील कदम, सत्यजित कदम, संभाजी जाधव, ईश्वर परमार, विजय सूर्यवंशी, विलास वास्कर, नीलेश देसाई, प्रकाश नाईकनवरे होते. या सर्वांनी स्थायी समिती सभागृहात जाऊन तेथे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
भाजप-ताराराणी उमेदवारांचे प्रत्येक एक अर्ज
भाजपतर्फे सविता शशिकांत भालकर यांनी महापौरपदासाठी दाखल केलेल्या अर्जावर भाग्यश्री शेटके या सूचक असून, अजित ठाणेकर यांनी अनुमोदन दिले आहे; तर ‘ताराराणी’तर्फे अर्ज भरलेल्या स्मिता मारुती माने यांच्या अर्जावर अर्जना पागर या सूचक असून नीलेश देसाई यांनी अनुमोदन दिले आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून संतोष बाळासाहेब गायकवाड यांनी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या अर्जावर ललिता बारामते या सूचक असून विलास वास्कर यांनी अनुमोदन दिले आहे; तर ताराराणी आघाडीकडून राजसिंह भगवानराव शेळके यांच्या अर्जावर सीमा कदम या सूचक असून, राजाराम गायकवाड यांनी अनुमोदन दिले आहे.
‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले
पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेची निवडणूक आणि विधानसभेच्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कॉँग्रेसच्या मजबुतीकरणासाठीचा प्रयत्न म्हणून अश्विनी रामाणे यांचे नाव महापौरपदासाठी कॉँग्रेस पक्षातर्फे निश्चित करण्यात आले असल्याची अचूक बातमी सोमवार (दि. ९) च्या अंकात पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीची शहरात दिवसभर चर्चा होती. दुपारी चार वाजता कॉँग्रेस पक्षाने रामाणे यांच्या नावाची घोषणा करून ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरविले.
कॉँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे तीन अर्ज
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे महापौर-उपमहापौर या पदांचे उमेदवार दुपारी सव्वाचार वाजता महापालिकेत पोहोचले. त्यांच्यासोबत महापौर जयश्री डकरे, आर. के. पोवार, राजेश लाटकर, प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख, चंद्रकांत घाटगे, आदी नेते होते. कॉँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार अश्विनी अमर रामाणे यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एका अर्जावर सुभाष बुचडे-संजय मोहिते सूचक-अनुमोदक आहेत, तर दुसऱ्या अर्जावर अशोक जाधव-दिलीप पोवार सूचक-अनुमोदक आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या शमा सलीम मुल्ला यांनी तीन अर्ज दाखल केले. त्यांच्या अर्जांवर सूरमंजिरी लाटकर, सचिन पाटील, सुनील पाटील हे सूचक असून त्यांना सरिता मोरे, मुरलीधर जाधव, संदीप कवाळे यांनी अनुमोदन दिले आहे.
कॉँग्रेसकडून दिवाळी साजरी
महानगरपालिका सभागृहातील संख्याबळ पाहता कॉँग्रेसच्या अश्विनी रामाणे या महापौर होणार हे आता स्पष्टच आहे. त्यामुळे त्यांनी महापौरपदाचा अर्ज दाखल केल्यानंतर महापालिक ा चौकात त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. कॉँग्रेस आणि रामाणे कुटुंबियांची खऱ्या अर्थाने मंगळवारी दिवाळी साजरी झाली.
मुश्रीफ यांनी फोनवर दिला आदेश
राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक महापालिकेत जाण्यापूर्वी पक्षाच्या ताराबाई पार्क येथील जिल्हा कार्यालयात जमले होते. माजी मंत्री हसन मुश्रीफ येतील, अशी सर्वांना प्रतीक्षा होती; परंतु ते चार वाजेपर्यंत आले नाहीत. शेवटी त्यांनी मोबाईलवर निरोप दिला. मोबाईलचा स्पीकर आॅन करून त्यांचा निरोप सर्वांना ऐकविण्यात आला. त्यांनी शमा मुल्ला यांचा उपमहापौरपदाचा अर्ज भरा, असा आदेश दिला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचीही ‘चमत्कारा’ची भाषा
काँग्रेसचे २७ तर राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक असून २ अपक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे संख्याबळ ४४ झाले आहे. याउलट ताराराणी आघाडीकडे १९ तर भाजपकडे १३ नगरसेवक आहेत. त्यांना एका अपक्षाने पाठिंबा दिला असून त्यांचे संख्याबळ ३३ आहे. सेनेने त्यांना पाठिंबा दिला तर ते ३७ पर्यंत पोहोचू शकते तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील ‘राजकारणात काहीही घडत असते’ असे सांगत आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीनेही ‘चमत्कार बघाच’ असे आव्हान दिले. आमचे संख्याबळ ४८ वर जाईल, असे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सेनेचे चार नगरसेवक कोणाच्या बाजूला झुकणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
सर्वांना पदे मिळतील, एकनिष्ठ राहा
महानगरपालिकेत जाण्यापूर्वी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीस माजी मंत्री सतेज पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते. दहा ते पंधरा मिनिटे चाललेल्या या बैठकीत महापौरपदासाठीचे उमेदवार म्हणून अश्विनी रामाणे यांच्या नावाची घोषणा प्रल्हाद चव्हाण यांनी केली. प्रत्येकाला पदे मिळतील. नेत्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून पक्षाशी एकनिष्ठ राहा. राजकारणात आल्याबरोबर पदे मिळत नसतात. मी सतरा वर्षांनी महापौर झालो; त्यामुळे नेत्यांचा शब्द पाळा, असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.