महापौर माळवी आज एसबीसमोर हजर होणार
By Admin | Updated: February 5, 2015 01:37 IST2015-02-05T01:37:42+5:302015-02-05T01:37:42+5:30
लाच प्रकरणी महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष जिल्हा न्यायालयाने फेटाळला

महापौर माळवी आज एसबीसमोर हजर होणार
कोल्हापूर : लाच प्रकरणी महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे माळवी यांना गुरुवारी अटक करण्याची तयारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली आहे; परंतु त्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन एसीबीसमोर हजर होणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.
माळवी यांचा चौकशी जबाब अद्याप अपुरा आहे. त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डिंगची (आवाजाची) तपासणी अद्याप झालेली नाही. ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी माळवी यांना अटक होणे गरजेचे आहे. म्हणून त्यांचा जामीन नामंजूर केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. जामीन फेटाळताच एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी माळवी ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तेथील डॉक्टरांना फोन केला व माळवी यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी अर्धा तास पोलिसांना कळविण्याच्या सूचना केली. त्या रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. शिवाजी पेठेतील महापालिकेने संपादन केलेली परंतू वापर न केलेली जागा परत देण्यासाठी तक्रारदार संतोष पाटील यांच्याकडून ़लाच स्वीकारल्याच्या संशयावरून माळवी व अश्विन गडकरी यांना एसीबीने ३० जानेवारीला पकडले होते.