मुंबईत महापौर निवड ८ मार्चला; प्रशासनाचा निर्णय
By Admin | Updated: March 2, 2017 05:57 IST2017-03-02T05:17:49+5:302017-03-02T05:57:26+5:30
अपक्षांना गळाला लावून महापौरपदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या शिवसेनेला पालिका प्रशासनाने आज झटका दिला.

मुंबईत महापौर निवड ८ मार्चला; प्रशासनाचा निर्णय
मुंबई: अपक्षांना गळाला लावून महापौरपदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या शिवसेनेला पालिका प्रशासनाने आज झटका दिला. महापौरपदाच्या निवडणुकीच्या तारखेवरून सुरू असलेला घोळ मिटवण्यासाठी शिवसेनेचे शिलेदार पालिका मुख्यालयात अवतरले. मात्र भाजपने त्यापूर्वीच आयुक्त अजय मेहता यांना गाठून महापौर निवडणुकीसाठी ८ मार्च या तारखेवर शिक्कामोर्तब करून घेतले. यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीबाबतची उत्सुकता आणि गूढ आणखी वाढले आहे.
पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपातील सामना बरोबरीत सुटला. मात्र सत्तेचे गणित जुळवण्यासाठी अद्याप उभय पक्षांना ‘मॅजिक फिगर’ गाठता आलेली नाही. त्यामुळे सेना-भाजपा युतीची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपाच्या नरमाईमुळे असे संकेत मिळत आहेत. मात्र तरीही शिवसेनेने चार अपक्षांना आपल्याकडे वळवून महापौरपदाच्या दिशेने कूच केली आहे. तथापि, आता ९ मार्चला होणारी ही निवडणूक ८ मार्चलाच दुपारी १२ वाजता घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ८ मार्च या तारखेवर शिक्कामोर्तब झाले. ही तारीख बदलण्यासाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, तृष्णा विश्वासराव ही नेतेमंडळी आज दुपारी मुंबई महापालिकेत धडकली. मात्र आयुक्तांचे मतपरिवर्तन त्यांना काही करता आले नाही. यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, भाजपाच्या दबावाखाली हा निर्णय झाल्याचा आरोप सेनेने केला आहे. महापौरपद यंदा खुले असल्याने शिवसेनेतील बड्या नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये पुरुष नगरसेवकच नव्हे, तर महिला नगरसेवकांनीही जोर लावला आहे.
>... तर शिवसेनेला संधी
काँग्रेसने आपला उमेदवार महापौरपदासाठी उभा केल्यास राष्ट्रवादी, समाजवादी, एमआयएम, मनसे असे विरोधी पक्षाचे नगरसेवक काँग्रेस उमेदवाराला मतदान करतील. त्यामुळे भाजपाला त्यांच्या ८२ नगरसेवकांचीच मते मिळतील. तर शिवसेनेला त्यांच्याकडे असलेल्या ८९ नगरसेवकांचा कौल मिळून त्यांचा महापौर निवडून येईल. तथापि, भाजपाने फोडाफोडी केल्यास शिवसेनेला फटका बसू शकतो.