मेयोला मिळाल्या वाढीव ५० जागा!
By Admin | Updated: July 18, 2014 01:00 IST2014-07-18T01:00:18+5:302014-07-18T01:00:18+5:30
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात वाढविलेल्या राज्यातील एमबीबीएसच्या ५०० जागा पायाभूत सुविधांचे कारण पुढे करून यावर्षी राखून ठेवल्या होत्या.

मेयोला मिळाल्या वाढीव ५० जागा!
नागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात वाढविलेल्या राज्यातील एमबीबीएसच्या ५०० जागा पायाभूत सुविधांचे कारण पुढे करून यावर्षी राखून ठेवल्या होत्या. परंतु मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, केंद्रीय आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी चालविलेल्या संयुक्त प्रयत्नामुळे या संपूर्ण जागा परत मिळाल्या. परिणामी मेयोला ५० वाढीव जागांचा फायदा झाला असून प्रवेश प्रक्रिया जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून होण्याची शक्यता आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचे प्रमाण वाढविण्यासाठी एमबीबीएसच्या जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मागील वर्षी केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्यातील शासकीय कॉलेजांमध्ये ५०० जागा वाढणार होत्या त्यादृष्टीने ५० व १०० जागा असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजांकडून तातडीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने मेयोनेही प्रस्ताव सादर केला होता. परंतु बरीच वर्षे होऊनही पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा ठपका एमसीआयने ठेवला.
यामुळे ५०० जागा राखून ठेवल्या. या वर्षी जुन्याच जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या. गेलेल्या जागा मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, केंद्रीय आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी संयुक्त प्रयत्न चालविले होते.
या विषयावर एमसीआयने नुकतीच बैठक घेऊन मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. १५ जुलै रोजी यावर निर्णय घेण्यात आला.
यामुळे मेयोला वाढीव ५० जागा मिळाल्या. या आशयाचे पत्र मेयोला गुरुवारी मिळाले. (प्रतिनिधी)