आरोपींची जामीन सुनावणी २४ मे रोजी
By Admin | Updated: May 22, 2016 03:46 IST2016-05-22T03:46:28+5:302016-05-22T03:46:28+5:30
मालेगाव २००६ बॉम्बस्फोटातील चार आरोपींच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. आता या अर्जावरील पुढील सुनावणी २४ मे रोजी ठेवण्यात आली आहे.

आरोपींची जामीन सुनावणी २४ मे रोजी
मुंबई : मालेगाव २००६ बॉम्बस्फोटातील चार आरोपींच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. आता या अर्जावरील पुढील सुनावणी २४ मे रोजी ठेवण्यात आली आहे. लोकेश शर्मा, धनसिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरवारिया यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.
एप्रिल महिन्यातच विशेष न्यायालयाने सिमीच्या नऊ कार्यकर्त्यांना या बॉम्बस्फोटातून आरोपमुक्त केले. मक्का मशीद बॉम्बस्फोटाप्रकरणी २००७मध्ये केस नोंदवण्यात आली. त्या केसमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्वामी असीमानंद याला ताब्यात घेतले. आरएसएसचे नेते सुनील जोशी याने मालेगावमधील दोन्ही बॉम्बस्फोट हे त्यांच्याच ‘मुलां’चे काम असल्याचे आपल्याला सांगितले, असा कबुलीजबाब असीमानंद याने एनआयएला दिला.
अटक केलेल्या सिमीच्या नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध एनआयएकडे पुरावे नसल्याने एनआयएने त्यांच्या जामीन अर्जावर व त्यानंतर त्यांच्या आरोपमुक्त करण्याच्या अर्जावर आक्षेप घेतला नाही. एनआयएने या प्रकरणी लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरवारिया यांना आरोपी केले आहे. या चौघांनीही विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. असीमानंदच्या कबुलीजबाबावरून आपल्याला या केसमध्ये अडकवण्यात आलेले आहे. त्याव्यतिरिक्त एनआयकडे आपल्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असे या चौघांनीही जामीन अर्जात म्हटले आहे.
एनआयएचा युक्तिवाद पूर्ण न झाल्याने विशेष न्यायालयाने या खटल्याची सुनावणी २४ मेपर्यंत तहकूब केली. (प्रतिनिधी)