माऊलींची पालखी मल्हार नगरीत
By Admin | Updated: July 14, 2015 23:54 IST2015-07-14T23:54:39+5:302015-07-14T23:54:39+5:30
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या मल्हारी मातंर्डाचे नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सायंकाळी

माऊलींची पालखी मल्हार नगरीत
जेजुरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या मल्हारी मातंर्डाचे नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सायंकाळी प्रवेश केला. जेजुरीकरांनी भंडाऱ्याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत केले.
वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबऱ्याची उधळण करीत गडकोटात जाऊन येळकोट येळकोट जय मल्हार, आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात दर्शन घेतले. संत सोपानकाकांच्या सासवड नगरीत माऊलींची नित्य महापूजा झाल्यानंतर पालखी सोहळ्याने सकाळी ७.३० वाजता जेजुरीकडे प्रस्थान ठेवले.
माऊली चॅरिटेबल ट्रस्टतर्फे १०० डॉक्टरांच्या पथकासह आळंदी ते पंढरपूरपर्यंत सोहळ्याला मोफत आरोग्य सेवा व औषधोपचार पुरवण्यात येत आहेत. बुधवारी पहाटे सोहळा वाल्हे मुक्कामी प्रस्थान ठेवणार आहे. (प्रतिनिधी)
आत्मिक समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा या हेतूने सहभागी झालो आहे़ कमीत कमी १५ दिवस तरी मनाला शांतता व समाधान वैष्णवाच्या सहवासात लाभेल, याची अनुभुती घेण्यासाठी सहभागी झालो.
- दीपक भोसले, मालेगाव, जि़ धुळे
पुण्यात चहाची हातगाडी असून या पायी वारीत सहभागी होऊन व्यसनापासून दूर राहता येईल का याचा अनुभव घेण्यासाठी पालखी सोहळ्यात पहिल्यादांच सहभागी झालो आहे़
- अविनाश जाधव, पुणे
वारकऱ्यांनी निर्माण केला स्वच्छतेचा आदर्श
वारकऱ्यांच्या माथी अस्वच्छतेबद्दल खापर फोडले जात असताना मंगळवारी सासवडच्या तळावर वारकऱ्यांनी स्वच्छतेचा आगळावेगळा आदर्श निर्माण केला. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंगळवारी जेजुरीत दाखल झाली असून, बुधवारी वाल्हे येथे मुक्कामी जाणार आहे.
वारकरी स्वच्छता पाळत नाहीत, बेशिस्त वागतात असा त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जातो. ते काही अंशी ते खरे असले तरी वारकऱ्यांना पर्याय उपलब्ध नसल्याने पालखी मार्गावर अस्वच्छता राहते. त्यावर उपाय म्हणून आळंदीच्या चोपदार फाउंडेशन व पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टने वारकऱ्यांना ५० हजार पिशव्यांचे वाटप केले. कचरा, शिळे अन्न कुठेही न टाकता पिशवीत भरावे, असे आवाहन त्यांना करण्यात आले होते.