‘इंदू मिल’वरून मातंग समाज आक्रमक
By Admin | Updated: May 5, 2015 01:37 IST2015-05-05T01:37:26+5:302015-05-05T01:37:26+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी प्रत्यक्ष कामाची सुरुवात १८ मेपर्यंत करा, नाहीतर बेमुदत उपोषण सुरू करू,

‘इंदू मिल’वरून मातंग समाज आक्रमक
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी प्रत्यक्ष कामाची सुरुवात १८ मेपर्यंत करा, नाहीतर बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा अखिल भारतीय मातंग संघाने दिला आहे. शिवाय मातंग समाजाला अनुसूचित जातीत स्वतंत्र ८ टक्के आरक्षण देण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले म्हणाले, की गेल्या काही महिन्यांपासून युती सरकारकडून वारंवार बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन लवकरच करण्याची घोषणा करण्यात येत आहे. मात्र नेमके भूमिपूजन कधी होणार आणि इंदू मिलच्या जागेवर प्रत्यक्ष बांधकामास कधी सुरुवात होणार, याबाबत कोणताही खुलासा सरकारने केलेला नाही. त्यामुळे १७ मेपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात केली नाही तर १८ मेपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा गोपले यांनी दिला आहे. गोपले गेल्या १ हजार ४६० दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे. दरम्यान, सत्तेत येण्याआधी भाजपा नेते विनोद तावडे, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस यांनी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा गोपले यांनी केला आहे. त्याप्रमाणे सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनाची पूर्तता करण्याचे आवाहन गोपले यांनी केले. मातंग आरक्षण समितीची स्थापना करण्याची मागणी गोपले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)