चटई पुरवठादाराचे गौडबंगाल
By Admin | Updated: June 30, 2015 02:56 IST2015-06-30T02:56:28+5:302015-06-30T02:56:28+5:30
परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील भवानी एंटरप्रायझेसला १२,७०२ प्लॅस्टिक चटया पुरवठा करण्याचा १ कोटी ८० लाख रुपयांचा कार्यादेश महिला व बाल कल्याण विभागाने दिला आहे.

चटई पुरवठादाराचे गौडबंगाल
- सोपान पांढरीपांडे /विजय चोरडिया , नागपूर/ जिंतूर
परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील भवानी एंटरप्रायझेसला १२,७०२ प्लॅस्टिक चटया पुरवठा करण्याचा १ कोटी ८० लाख रुपयांचा कार्यादेश महिला व बाल कल्याण विभागाने दिला आहे. पण ‘लोकमत’च्या चौकशीत या फर्मबद्दल अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत.
शासनाच्या आदेशात भवानी एंटरप्रायझेसचा पत्ता प्लॉट नं. ए-१२, एमआयडीसी, जिंतूर असा दिला आहे. या ठिकाणी लोकमतच्या जिंतूर प्रतिनिधीने भेट दिली असता तिथे शाळांना लागणारे बेंचेस बनविण्याचा कारखाना बंद स्थितीत असल्याचे दिसून आले. या कारखान्याची शेड नुकतीच बांधली असून, तिथे प्लॅस्टिक चटया विणण्यासाठी लागणारे लूम्स (माग) नाहीत किंवा कच्चा माल म्हणजे पॉलीप्रॉपिलीनच्या धाग्यांचा साठाही आढळून आला नाही.
मालक कोण?
उद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल स्टोअर्स व प्रोक्युरमेंट आॅफिसने भवानी एंटरप्रायझेसशी जो दरकरार केला आहे त्यावर भवानी एंटरप्रायझेसचे दोन मोबाइल नंबर दिले आहेत. यापैकी एक फोन गजानन इटोलेकर यांचा आहे; तर दुसरा सुभाष पाखरे यांचा आहे, असे ट्रु कॉलर अॅपवरून समजले. यापैकी पाखरे यांच्या फोनवर प्रतिसाद मिळाला नाही; पण इटोलेकर यांना फोन केला असता पलीकडील इसमाने लोकमत प्रतिनिधीने आपले नाव सांगताच राँग नंबर म्हणून मोबाइल बंद केला. शनिवारी व रविवारी अनेक वेळा हा प्रकार झाला. जिंतुरात अधिक चौकशी केली असता भवानी फर्म्सचे मालक इटोलेकर असल्याचे कळले व पाखरे त्यांचे घनिष्ठ मित्र असल्याचे समजते. इटोलेकर व पाखरे हे दोघेही स्व. प्रमोद महाजन यांच्या कुटुंबाचे निकटवर्ती असल्याची माहिती मिळाली.
वॉटर फिल्टरप्रमाणे याही प्रकरणात चटयांचे टेंडर ७ फेब्रुवारीला निघाले व रेट कॉन्ट्रॅक्ट ११ फेब्रुवारीला मंजूर झाले व त्याच दिवशी १२,७०२ चटया घेण्याचा प्रस्ताव तयार झाला व १३ फेब्रुवारीला शासन आदेश निघाला.
भवानी एंटरप्रायझेसच्या मालकांनी फोनवर बोलण्यास नकार दिल्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
भवानी एंटरप्रायझेसचा पत्ता प्लॉट नं. ए-१२, एमआयडीसी, जिंतूर या पत्त्यावर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने भेट दिली. या पत्त्यावर नुकताच उभारलेला कारखाना दिसून आला. या ठिकाणी एकही बेंच दिसले नाही.
भवानी एंटरप्रायझेसच्या मालकांनी फोनवर बोलण्यास नकार दिला. या फर्मचा नेमका मालक कोण व इटोलेकर, पाखरे यांचे फोन नंबर सरकारी कागदपत्रात का आले त्याचा भवानी एंटरप्रायझेसशी काय संबंध आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
भवानी एंटरप्रायझेस या कारखान्याची शेड नुकतीच बांधली असून, तिथे प्लॅस्टिक चटया विणण्यासाठी लागणारे लूम्स (माग) नाहीत किंवा कच्चा माल म्हणजे पॉलीप्रॉपिलीनच्या धाग्यांचा साठाही आढळून आला नाही.