मनसेत पडली फूट!
By Admin | Updated: November 4, 2014 03:25 IST2014-11-04T03:25:57+5:302014-11-04T03:25:57+5:30
दोन महिन्यांपूर्वी राज नाशिक दौऱ्यावर असताना, गुडघेदुखीचे निमित्त करून गितेंनी भेटणे टाळले होते

मनसेत पडली फूट!
नाशिक : नाशिकमधील मनसेचे माजी आमदार वसंत गिते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या समर्थनार्थ पाठोपाठ दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे ‘कृष्णकुंज’वर पाठविले. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीनंतर पराभवाचे पोस्टमॉर्टेम करण्यास येत्या बुधवारी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच ही उलथापालथ घडल्याने राजगडाला धक्का बसला आहे.
मनसेचे माजी आमदार गिते हे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा होतीच. स्थानिक भाजपा नेत्यांनी त्यास दुजोरा दिला असला तरी गिते यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे़ आपण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, परंतु पक्ष सोडलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी गिते आपल्या किमान २० नगरसेवकांना घेऊन भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने अन्य नेत्यांनी तातडीने नगरसेवकांची बैठक घेऊन तटबंदी उभारण्याचा प्रयत्न चालवला आहे. आठ वर्षे आपण पक्षाची जबाबदारी सांभाळली; परंतु वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव प्रदेश सरचिटणीस पदावर काम करू शकत नसल्याने आपल्याला कार्यमुक्त करावे, अशी विनंती गिते यांनी राजीनाम्यात व्यक्त केली आहे.
तीन आमदार व महापालिकेची सत्ता असल्याने नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. मनसेच्या स्थापनेपासून राज यांच्याबरोबर असलेले गिते हे पक्षातील सर्वेसर्वा होते; परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज यांनी नाशिकमध्ये व विशेषत: महापालिकेतील सत्तेची सूत्रे पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव ढिकलेंकडे दिली. त्यानंतर गितेंची नाराजी सुरू झाली. दोन महिन्यांपूर्वी राज नाशिक दौऱ्यावर असताना, गुडघेदुखीचे निमित्त करून गितेंनी भेटणे टाळले होते. (प्रतिनिधी)