मातोश्रीवर येऊन गैरसमज दूर करावा!
By Admin | Updated: October 15, 2015 10:11 IST2015-10-15T02:57:08+5:302015-10-15T10:11:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याकरिता भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मातोश्रीवर येऊन गैरसमज दूर करावा!
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याकरिता भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या अपमानाबाबतचे गैरसमज दूर करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर येऊन भेट घ्यावी, असा निरोप शिवसेनेच्या चार मंत्र्यांनी बुधवारी त्यांना दिला. मात्र त्यावर फडणवीस यांनी चक्क मौन बाळगले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन करण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण ठाकरे यांना दिले गेले नाही याबद्दल मंत्र्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांना राजशिष्ठाचारानुसार व्यासपीठावर कसे बसवणार, असा प्रश्न सरकारने उपस्थित केला.
परिणामी निमंत्रण पाठवण्यास विलंब झाला व अखेरच्या क्षणी निमंत्रणाची औपचारिकता पूर्ण केली गेली हा सर्व प्रकार अपमानास्पद असल्याचे मंत्र्यांनी फडणवीस यांच्या कानावर घातले.
मुंबईतील विमानतळाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाला होता तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यासपीठावर बसले होते. तत्कालीन काँग्रेस सरकारमधील मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजशिष्टाचाराचा बाऊ केला नव्हता.
आता शिवसेना सरकारमध्ये असताना अचानक राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे उद्धव ठाकरे दुखावले असून झालेले गैरसमज दूर करण्याकरिता मातोश्रीवर येऊ भेटा, असा
निरोप मंत्र्यांनी फडणवीस यांना दिला. त्यावर फडणवीस यांनी कुठलीच प्रतिक्रिया न दिल्याने शिवसेनेचे मंत्री अस्वस्थ झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
>>राज्यातील सरकारला वर्ष पूर्ण होत असताना भाजपा-शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपाच्या राज्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक दादर येथील वसंत स्मृती येथे उद्या(गुरुवारी) बोलावली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या बैठकीत युती तोडून तीन पायांची शर्यत संपवण्याची मागणी झाली होती. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत शिवसेनेबाबत आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष काय भूमिका घेतात याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.