माथेरान पोलिसांनी हरवलेल्या मुलाचा एक तासात घेतला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 06:11 IST2017-05-04T06:11:52+5:302017-05-04T06:11:52+5:30
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये हजारो पर्यटक दररोज येत असतात. मुंबईपासून माथेरान हे जवळचे

माथेरान पोलिसांनी हरवलेल्या मुलाचा एक तासात घेतला शोध
माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये हजारो पर्यटक दररोज येत असतात. मुंबईपासून माथेरान हे जवळचे पर्यटनस्थळ असल्याने मुंबई येथील पर्यटक जास्त प्रमाणात येतात. मालाड येथील दवे कुटुंब माथेरानला फिरण्यासाठी आले असता त्यांचा मुलगा हरवला. मात्र, माथेरान पोलिसांनी त्यास फक्त एक तासात शोधून काढले. यामुळे माथेरान पोलिसांचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे.
या मुलाचे नाव अंश तुषार दवे (९) असून दवे हे कुटुंबासह मंगळवार, २ मे रोजी माथेरान येथील हॉटेलमध्ये उतरले होते. दुसऱ्या दिवशी बुधवार, ३ मे रोजी सकाळी १० वाजता हॉटेलचा चेक आऊट करून बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गेले होते, तिथून अंश हरवला. मुलाचा सर्व बाजारपेठेमध्ये शोध घेतला असता मुलगा कुठेच दिसत नव्हता. हवालदिल झालेल्या मुलाची आई कृष्णा व वडील तुषार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे यांनी या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक बाजारपेठेत पाठवले. एवढेच नाही तर सोशल मीडियाचा वापर करून गावकऱ्यांना संदेश पाठवून माहिती दिली असता दुपारी १२ वाजता पर्यटकांच्या सेवेसाठी असणारे निखिल शिंदे यांनी बाजारपेठेपासून सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या अमन लॉज स्टेशन येथे या मुलाला पाहिले. मुलगा रडतरडत रेल्वे रुळावरून टॅक्सी स्टॅन्डकडे जात होता, तेव्हा निखिल याने त्या मुलाची समजूत काढून त्या मुलास पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्या आई- वडिलांना बाजारपेठेतच त्या मुलाला सोपविले. त्यामुळे निखिल शिंदे या तरु णाचे, पोलिसांचे कौतुक होत आहे.(वार्ताहर)
माथेरान हे पर्यटन स्थळ आहे. येथे हजारो पर्यटक निसर्गाची मजा लुटण्यास येतात. तेव्हा त्यांनी निसर्गाची मजा घेत असताना आपल्या कु टुंबाकडे विशेषत: लहान मुलांकडे लक्ष द्यावे. येणाऱ्या पर्यटन हंगामासाठी हे पोलिसांकडून आवाहन आहे.
- राजवर्धन खेबुडे,
उपनिरीक्षक