गणित, विज्ञान आॅलिम्पियाड कार्यशाळा
By Admin | Updated: July 20, 2016 04:25 IST2016-07-20T04:24:56+5:302016-07-20T04:25:19+5:30
गणित आणि विज्ञानाची भीती कमी व्हावी, त्यांना या विषयांची गोडी लागावी, यासाठीची कार्यशाळा नुकतीच डोंबिवलीत टिळकनगर ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडली.

गणित, विज्ञान आॅलिम्पियाड कार्यशाळा
डोंबिवली : शालेय मुलांमधील गणित आणि विज्ञानाची भीती कमी व्हावी, त्यांना या विषयांची गोडी लागावी, यासाठीची कार्यशाळा नुकतीच डोंबिवलीत टिळकनगर ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडली. एमकेसीएलच्या महाराष्ट्र आॅलिम्पियाड मूव्हमेंटतर्फे ती घेतली जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध आॅलिम्पियाड स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वाढवणे, हा त्याचा मूळ हेतू आहे.
विज्ञान व गणित प्रसाराचा कार्यक्रम गेली नऊ वर्षे राबवला जातो. या उपक्रमांतर्गत ‘महाराष्ट्र आॅलिम्पियाड मूव्हमेंट’ ही राज्यव्यापी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यंदा महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यांमधून या परीक्षेला उत्तम प्रतिसाद मिळाला. ३० हजारांहून अधिक विद्यार्थी त्यात सहभागी झाले. परीक्षेच्या पहिल्या फेरीत प्रत्येक जिल्ह्यातील सहभागी विद्यार्थ्यांपैकी २० टक्के विद्यार्थी राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र होतात आणि द्वितीय फेरीत राज्यस्तरावरील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. पाचवी ते दहावीतील प्रथम १२ म्हणजे ७२ विद्यार्थ्यांची कार्यशाळा पुण्यात होते. तशीच जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ७२ विद्यार्थ्यांची कार्यशाळा जिल्हा पातळीवर होते. ती टिळकनगर ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडली.
त्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे आयोजन एमकेसीएलच्या ठाणे जिल्हा लोकल लीड सेंटरतर्फे करण्यात आले. सेंटरचे इंद्रनील मयेकर, एमओएम प्रोग्राम समन्वयक सुधीर शेजवळ, समीर वारेकर आदी उपस्थित होते.
ग्रामीण, शहरी आणि वनवासी अशा सर्व विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आहे. गरज आहे, संधीची. (प्रतिनिधी)