रुग्णालयाच्या दारातच प्रसूती, अर्भकाचा मृत्यू
By Admin | Updated: September 6, 2016 03:54 IST2016-09-06T03:54:12+5:302016-09-06T03:54:12+5:30
वेळेवर दाखल करून न घेतल्याने महापालिका रुग्णालयाच्या दारातच सोमवारी एका महिलेची प्रसूती झाली

रुग्णालयाच्या दारातच प्रसूती, अर्भकाचा मृत्यू
अहमदनगर : वेळेवर दाखल करून न घेतल्याने महापालिका रुग्णालयाच्या दारातच सोमवारी एका महिलेची प्रसूती झाली, त्यात अर्भकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे.
बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात सकाळी प्रसूतीसाठी आलेल्या प्रीती महेंद्र जोशी यांना डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यासाठी एका खासगी डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
जोशी यांना सोनोग्राफी करण्यासाठी नेले. मात्र तेथे गर्दीमुळे त्यांची वेळेवर तपासणी झाली नाही, त्यातच त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी त्यांना पुन्हा देशपांडे रुग्णालयात आणले. रुग्णालयात नेत असताना प्रवेशदारातच त्या प्रसूत झाल्या. त्यानंततर कर्मचारी आले, मात्र १५ मिनिटे डॉक्टर तिकडे फिरकलेच नाहीत. काही महिला कर्मचाऱ्यांनी जोशी यांना दाखल करून घेतले. मात्र जन्मलेले अर्भक मृत असल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच आ. संग्राम जगताप, नगरसेवक विपुल शेटिया, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रुग्णालयात आले. डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आ. जगताप यांनी केली. कॉल आॅन डॉक्टर सुविधा असताना महिलेची तपासणी का झाली नाही, असा सवाल जगताप यांनी केला.
मात्र डॉक्टरांनी त्याबाबत मौन बाळगले. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)