मुंबईकरांचा दुहेरी वातावरणाशी सामना
By Admin | Updated: February 2, 2015 04:55 IST2015-02-02T04:55:54+5:302015-02-02T04:55:54+5:30
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कमी-अधिक होत असतानाच मुंबईच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत

मुंबईकरांचा दुहेरी वातावरणाशी सामना
मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कमी-अधिक होत असतानाच मुंबईच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत. वातावरणातील बदलामुळे मुंबईत दिवसा ऊन तर, रात्री सुटणाऱ्या गार वाऱ्यामुळे बोचरी थंडी पडत आहे. अशा दुहेरी वातावरणाचा मुंबईकरांना सध्या सामना करावा लागत आहे.
राज्यात थंड लाटेचा काहीसा प्रभाव असल्याने मागील २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट होती तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. राज्यात पुढील २४ तासांत दिवसा आणि रात्रीच्या किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुसरीकडे विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंद झाले आहे.
मुंबईत दोन दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली आहे. कमाल तापमान ३३ तर, किमान २१ अंशावर पोहोचले आहे. तत्पूर्वी मुंबईचे कमाल तापमान २७ व किमान तापमान १५ अंश एवढे नोंद होत होते. परंतु तीन ते चार दिवसांत झालेल्या वातावरणातील बदलांमुळे दिवसा व रात्रीच्या हवेतील फरकामुळे मुंबईकरांना दुहेरी वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. पुढील ४८ तासांत मुंबईत असेच हवामान कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)