मीरा रोड कॉल सेंटरचा मास्टरमाईंड शॅगी फक्त 23 वर्षांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 13:28 IST2016-10-10T12:41:46+5:302016-10-18T13:28:05+5:30
शॅगी असे या युवकाचे नाव आहे. मागच्या मंगळवारी हा घोटाळा उघड झाल्यापासून शागर फरार असून त्याचा साथीदार तपशही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

मीरा रोड कॉल सेंटरचा मास्टरमाईंड शॅगी फक्त 23 वर्षांचा
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 10 - मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटर घोटाळयातील मुख्य सूत्रधाराचे वय अवघे 23 वर्ष असल्याची नवी माहिती समोर आली आहे. शागर ठक्कर उर्फ शॅगी असे या युवकाचे नाव आहे. मागच्या मंगळवारी हा घोटाळा उघड झाल्यापासून शागर फरार असून त्याचा साथीदार तपशही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
मीरा रोडच्या हरी ओम आयटी टॉवर इमारतीतून चालवल्या जाणा-या बोगस कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरीकांना फोन केले जायचे. विमा पॉलिसी विक्री तसेच कर गोळा करण्याची धमकी देऊन अमेरिकन नागरीकांकडून पैसे उकळले जायचे. ठाणे पोलिसांच्या 200 जणांच्या पथकाने मागच्या मंगळवारी कारवाई करुन सात कॉल सेंटर्सना सील ठोकले.
शागरची ऐशोआरामी लाईफस्टाईल होती. त्याच्याकडे अनेक महागडया गाडया आहेत. पैशांची तो उधळण करायचा. आमचे सिनिअर्स जास्तीत जास्त बिझनेस आणण्यासाठी त्याचे उदहारण द्यायचे असे या कॉलसेंटर्समध्ये काम करणा-या कर्मचा-यांनी पोलिस चौकशीत सांगितले. अनेक अमेरिकन तपास यंत्रणा ठाणे पोलिसांच्या संपर्कात होत्या. त्यामुळे हा घोटाळा उघड झाला. कॉल सेंटरमधूनच नव्हे तर, घरातूनही अमेरिकन नागरीकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरु असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
अनेक कॉल सेंटरवरून कर गोळा करण्याची धमकी देत रकमेची वसुलीही केली जायची. या कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी (व्हॉइस ओवर इंटरनेट पोर्टल)वरून कॉल केला जायचा. अमेरिकन इंटर्नल रेव्हेन्यू ऑफिसर असल्याची बतावणी करीत अनेकांना कर चुकविल्याचे सांगत खटला दाखल करण्याचीही धमकी दिली जायची.
दंडापोटी १० हजार डॉलर्सची मागणी करून नंतर कमी रकमेवर तडजोड करून रक्कम टार्गेट गिफ्ट कार्डद्वारे वसूल करण्याचा सपाटा या सेंटरमधून सुरू होता. या प्रकरणी 70 कर्मचा-यांना अटक केली असून, 630 जणांना नोटीस पाठवली आहे.