मीरा रोड बनावट कॉल सेंटर प्रकरणातील मास्टरमाईंड गजाआड
By Admin | Updated: April 8, 2017 14:04 IST2017-04-08T08:19:38+5:302017-04-08T14:04:59+5:30
मीरा रोड येथील बनावट कॉल सेंटर प्रकरणातील मास्टरमाईंड सागर ठक्कर उर्फ शॅगीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

मीरा रोड बनावट कॉल सेंटर प्रकरणातील मास्टरमाईंड गजाआड
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - मीरा रोड येथील बनावट कॉल सेंटर प्रकरणातील मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सागर ठक्कर उर्फ शॅगी याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला 13 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.
मीरा रोडमधल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणी अमेरिकेनं 61 भारतीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 20 जणांना अमेरिकेतच अटक करण्यात आली आहे. मीरा रोड भागातील 7 बनावट कॉल सेंटर्सच्या माध्यमातून तब्बल 6 हजार 400 अमेरिकन नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
मीरा रोड भागातील या 7 बनावट कॉल सेंटरवर 4 ऑक्टोबर 2016 रोजी रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. रॉयल कॉलेज शेजारील डेल्टा बिल्डिंगमधून तब्बल 700 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ठाणे गुन्हे शाखेच्या 200 पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली होती. देशात कॉल सेंटरवर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचं सांगितलं जातं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
अमेरिकन नागरिकांकडून करोडो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार 2016 करण्यात आली होती. मार्च महिन्यात १०० कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. फसवणुकीचा हा सर्व कारभार मीरा रोड भागातील सात कॉल सेंटरमधून केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अमेरिकन आयआरएस (इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस)चे अधिकारी असल्याची बतावणी करून अमेरिकन नागरिकांची या टोळीने फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले होते.
डेल्टा टॉवरच्या सातव्या मजल्यावर वेगवेगळ्या लोकांकडून सात कॉल सेंटर चालवले जात होते. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी (व्हॉइस ओव्हर इंटरनेट पोर्टल) वरून कॉल केला जायचा. अमेरिकन इंटरनल रेव्हेन्यू ऑफिसर्स असल्याची बतावणी करीत अनेकांना टॅक्स चुकवल्याचे सांगून खटला दाखल करण्याचीही धमकी दिली जायची.
कॉल सेंटर घोटाळ्यातील कार होती विराट कोहलीच्या नावावर
बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना सुमारे ५०० कोटींचा गंडा घालणाऱ्या घोटाळ्यातील सूत्रधार सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याने भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडून खरेदी केलेली तीन कोटींची ऑडी आर-८ ही कार आता ठाणे पोलिसांनी हरियाणातून हस्तगत केली होती. ही कार शॅगीने एका दलालाकडून खरेदी केली. कार खरेदीनंतर तिची कागदपत्रे त्याच्या नावावर करण्यासाठी पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे तो देण्यास टाळाटाळ करीत होता. या कारच्या खरेदीनंतर शॅगीने ती आपल्या अहमदाबादच्या प्रेयसीला भेट दिली होती.
सागर ठक्कर उर्फ शॅगीच पार्श्वभूमी
बोरिवलीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला शॅगी कालांतराने अहमदाबाद येथे स्थलांतरित झाला. तिथेच त्याने बनावट कॉल सेंटरची शक्कल लढवली. आधी अहमदाबादमध्ये या बनावट कॉल सेंटरचे जाळे उभे केल्यानंतर त्याने ठाणे जिल्ह्यातील भार्इंदर परिसरातील मीरा रोडमध्येही कॉल सेंटरचा हा पसारा उभा केला.
५ ऑक्टोबर रोजी मीरा रोड परिसरातील १२ कॉल सेंटरवर धाड टाकून हा करोडो रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला.