‘मास्टर ब्लास्टर’च्या कन्येला लग्नासाठी फोनवरून वारंवार धमकी, परप्रांतीय तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:37 IST2018-01-08T03:37:11+5:302018-01-08T20:37:08+5:30
‘मास्टर ब्लॉस्टर’ सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालत, नकार दिल्यास अपहरण करण्याची धमकी देणा-या परप्रांतीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली.

‘मास्टर ब्लास्टर’च्या कन्येला लग्नासाठी फोनवरून वारंवार धमकी, परप्रांतीय तरुणाला अटक
मुंबई : ‘मास्टर ब्लॉस्टर’ सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालत, नकार दिल्यास अपहरण करण्याची धमकी देणा-या पश्चिम बंगालमधील एका तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. देवकुमार मेट्टी (३२) असे त्याचे नाव असून, रविवारी त्याला वांद्रेतून मुंबईत आणण्यात आले. महिन्याभरापासून तब्बल २२ वेळा तेंडुलकरच्या घरी फोन करून तो त्रास देत होता. साराला एकदा टीव्हीवर पाहिल्यानंतर तिच्या प्रेमात पडल्याची कबुली देवकुमार मेट्टी याने दिली आहे, तर त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे त्याचे शेजारी व नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प. बंगाल येथील मिडीनपोरमधील माहिशदल परिसरात राहाणारा देवकुमार हा सचिनच्या वांद्रे येथील निवासस्थानी फोन करून सारा तेंडुलकर हिला विवाहासाठी मागणी घालत होता. ‘जर तू नकार दिलास, तर तुझे अपहरण करीन,’ असे तो फोनवरून धमकावत होता. सुरुवातीला तेंडुलकर कुटुंबीयांनी या फोनकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, वारंवार फोन येत असल्याने, अखेर त्यांनी वांद्रे पोलिसांकडे तक्रार नोंदविली. देवकुमारने अखेरचा फोन २ डिसेंबरला केला होता. सारा तेंडुलकरने लेखी तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी कॉल रेकार्ड तपासले असता, हे फोन पश्चिम बंगालमधील मिडीनपोर या जिल्ह्यातून येत असल्याचे समजले. त्या ठिकाणी पथक पाठवून देवकुमारला शनिवारी अटक केली.
डायरीत सापडले साराचे फोटो-
देवकुमारच्या डायरीमध्ये पोलिसांना सारा तेंडुलकरचे फोटो सापडले आहेत. त्याने तिला प्रत्यक्षात कधीही बघितले नसले, तरी तिच्याबाबत तो फारच ‘सीरियस’ होता.
पोलिसांकडून चौकशी -
देवकुमारने महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले असून, तो बेरोजगार आहे. त्याच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्याने सचिनचे लँडलाइन फोन नंबर कसे मिळविले, त्याने अशा प्रकारे आणखी कोणत्या ‘सेलिब्रिटी’ला त्रास दिला आहे का, याबाबत त्याच्याकडे तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ट्रान्झिट रिमांड-
देवकुमारला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प. बंगालमधील स्थानिक पोलिसांची मदत घेतली. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले.