ऊसदर आंदोलनात मनसेची उडी!
By Admin | Updated: November 7, 2014 04:09 IST2014-11-07T04:09:42+5:302014-11-07T04:09:42+5:30
शेतकरी संघटनेच्या यंदाच्या ऊसदर आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल, असा निर्वाळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे

ऊसदर आंदोलनात मनसेची उडी!
इस्लामपूर (जि़ सांगली) : शेतकरी संघटनेच्या यंदाच्या ऊसदर आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल, असा निर्वाळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती रघुनाथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यानिमित्ताने मनसेचे आता ग्रामीण भागात आपले पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, ऊसदर आंदोलनात मनसेने उडी घेतल्याने अनेक भागांत खळ्ळ् खट्याकचा आवाज घुमण्याची चिन्हे आहेत़
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली़ भेटीत राज यांना राज्यातील साखर कारखानदारी, ऊसशेती आणि ऊसदराचे आंदोलन याची पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. उसाचा प्रतिएकरी व प्रतिटन उत्पादन खर्च, शासनाकडून प्रतिटन आकारण्यात येणारा कर, कारखान्यातील उपपदार्थ निर्मिती, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट, झोनबंदी, मोलॅसिसवरील बंदी, साखरेचा विनियोग अशा अनेक मुद्द्यांवर ठाकरे यांनी तपशीलवार माहिती घेतली. उत्पादित होणाऱ्या साखरेपैकी २० टक्के साखर जनतेसाठी, तर ८० टक्के साखर बड्या उद्योगांकडे जाते. मग उसाला चांगला आणि योग्य भाव मिळालाच पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर यंदाच्या ऊसदर आंदोलनात शेतकरी संघटनेच्या बरोबरीने मनसे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात रस्त्यावर उतरेल, अशी ग्वाही राज यांनी दिली़ यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, चिटणीस विनायक अभ्यंकर, मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोतरे, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले उपस्थित होते. (वार्ताहर)