शहीद जवान गावडे अनंतात विलीन
By Admin | Updated: May 25, 2016 04:56 IST2016-05-25T02:06:53+5:302016-05-25T04:56:04+5:30
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आंबोली या त्यांच्या गावी मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद जवान गावडे अनंतात विलीन
- महादेव भिसे, आंबोली (जि. सिंधुदुर्ग)
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आंबोली या त्यांच्या गावी मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिक त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. ‘वीर जवान पांडुरंग गावडे अमर रहे’, अशा घोषणांनी आसमंतही भावविव्हल झाला होता.
गावडे यांचे पार्थिव सकाळी साडेदहा वाजता गोव्यातून आंबोलीत आले. बेळगाव येथील मराठा लाईफ इन्फंट्रीच्या जवानांनी ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिला. त्यानंतर लष्कराच्या सजवलेल्या गाडीतून आंबोली दूरक्षेत्रापासून गावडे यांच्या घरापर्यंत चार किलोमीटर अंत्ययात्रा काढण्यात आली. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. पार्थिव घरी पोहोचल्यानंतर नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतले. दु:ख अनावर झाल्याने पाडुरंग यांच्या पत्नीची शुद्ध हरपल्याने त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.
घरापासून जवळच असलेल्या शेतात अंत्यसंस्कार झाले. यावेळी लष्कराच्या जवानांनी हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडून अखेरची सलामी दिली. मुलगा प्रज्वल याने मंत्राग्नी दिला.
सिंधुदुर्गवासियांना अभिमान
- वीर जवान पांडुरंग गावडे यांचा सिंधुदुर्गवासीयांना अभिमान असून, त्यांच्या नावाने आंबोली- चौकुळ येथे उचित स्मारक बांधण्यात येईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. तर शहीद गावडेंच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे खा. विनायक राऊत यांनी सांगितले.