खंडणी उकळणारा दहा दिवसांनी जेरबंद
By Admin | Updated: May 14, 2017 00:53 IST2017-05-14T00:53:36+5:302017-05-14T00:53:36+5:30
तीन वर्षीय मुलाचे अपहरण करून २० लाखांची खंडणी उकळणारा अपहरणकर्ता दहा दिवसांनंतर आळंदी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

खंडणी उकळणारा दहा दिवसांनी जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील सोळू येथील वरद गणेश ठाकूर या तीन वर्षीय मुलाचे अपहरण करून २० लाखांची खंडणी उकळणारा अपहरणकर्ता दहा दिवसांनंतर आळंदी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
नितीन उर्फ मारुती भरमा बाळकुंद्री-पाटील (वय २८ रा. होसूर ता. चंदगढ, जि. कोल्हापूर) असे अपहरणकर्त्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी (दि.१३) पहाटे तीनच्या सुमारास त्याच्या मूळ गावी आळंदी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली.
पोलिसांनी तत्काळ तीन विशेष पथके तपासासाठी रवाना केली. आळंदी शहरातील विविध रस्त्यांवरील सीसीटीव्ही यंत्रणा तपासल्यानंतर अपहरणकर्ता इसम बिगर क्रमांकाच्या दुचाकीवरून हेल्मेट घालून मुलाला घेऊन गेल्याचे निदर्शनात आले होते. आरोपीने संभाषणासाठी वापरलेल्या नंबरचा शोध घेतला असता, एक मोबाईल मोशी, तर दुसरा मोबाईल भोसरी येथून फोन करण्याच्या बहाण्याने चोरल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा संशय बळावला व त्याचा शोध घेऊन पहाटे तीनच्या सुमारास त्याला त्याच्या मूळ गावी नातेवाइकांच्या घरात पकडले.