जबरदस्तीने केला तरुणीशी विवाह
By Admin | Updated: July 20, 2016 03:29 IST2016-07-20T03:29:03+5:302016-07-20T03:29:03+5:30
तरुणीवर बलात्कार करून त्याची चित्रफीत इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करून त्या तरुणीशी बळजबरीने विवाह करणाऱ्या तरुणावर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जबरदस्तीने केला तरुणीशी विवाह
महाड : तरुणीवर बलात्कार करून त्याची चित्रफीत इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करून त्या तरुणीशी बळजबरीने विवाह करणाऱ्या तरुणावर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडालेली आहे. पीडित तरुणी ही महाड तालुक्यातील शहरानजीक एका गावातील असून आरोपी अशोक रिंगे (३०) रा. किंजळोली, ता. महाड हा फरारी झाला आहे.
अशोक रिंगे याने पीडित तरुणीशी ओळख काढून तिच्याशी मैत्री करीत त्याने तिचा विश्वास संपादन केला. २० आॅक्टोबर २०१२ रोजी रिंगे याने तिला रायगड मार्गावरील हॉटेल येलंगी येथे नेवून तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळेत त्याने त्या बलात्काराचे चित्रीकरण केले. नंतर ही फित आणि छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. सलग चार वर्षे हा प्रकार घडत राहिल्यानंतर अशोक रिंगे याने त्या तरुणीला बळजबरीने चिपळूण येथे नेले व विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर तिची जबरदस्तीने सही घेत त्यांच्याशी नाटक केले.
या प्रकरणी पीडित तरुणीने महाड येथील न्यायालयात याचिका दाखल करून अशोक रिंगे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सदर घटनेत तथ्य असल्याचे दिसून आल्यानंतर शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक रिंगे याच्यावर विविध कलमानुसार कारवाई होत आहे. तपास पो. नि. आर.पी.शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)