विवाहितासोबत संबंध बलात्कार नाही
By Admin | Updated: January 13, 2015 05:04 IST2015-01-13T05:04:38+5:302015-01-13T05:04:38+5:30
विवाहित पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवणारी महिला त्याने बलात्कार केल्याचा दावा करू शकत नाही, असे मत व्यक्त करीत उच्च न्यायालयाने त्या पुरुषाविरोधात महिलेने केलेली तक्रार रद्द केली़

विवाहितासोबत संबंध बलात्कार नाही
मुंबई : विवाहित पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवणारी महिला त्याने बलात्कार केल्याचा दावा करू शकत नाही, असे मत व्यक्त करीत उच्च न्यायालयाने त्या पुरुषाविरोधात महिलेने केलेली तक्रार रद्द केली़
या प्रकरणातील महिला सज्ञान आहे व तिला तो पुरुष विवाहित असल्याचे ज्ञात होते़, असे असतानाही ती त्याच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी गेली होती़ त्या पुरुषाने तिला विवाहाचे आमिष दाखवून आपल्या वासनेची भूक भागवून घेतली किंवा तिला खोटे आश्वासन दिले नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते़ त्यामुळे या दोघांमधील शारीरिक संबंध हे
तिच्या संमतीनेच झाले असावेत,
असे पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीतून दिसून येत असल्याचे निरीक्षणही न्या़ रणजित मोरे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने व्यक्त केले़ या महिलेने अॅड़ महेश वासवानी यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती़ पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्याशी विवाह करेन, असे आमिष दाखवून त्याने बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने कफ परेड पोलिसांत केली होती़ मात्र आता उभयतांमध्ये तडजोड झाली असल्याने ही तक्रार रद्द करावी, अशी मागणी या महिलेनेच याचिकेत केली होती़ अॅड. वासवानी यांच्यासोबत अॅड. धारिणी नागदा, अॅड. अनुश्री कुलकर्णी यांनी महिलेच्या वतीने युक्तिवाद केला.
बलात्कार हा गंभीर गुन्हा असून त्याची तक्रार सहज रद्द करणे योग्य नाही़ पण उभयतांमध्ये तडजोड झाल्याने ही तक्रार रद्द केली जात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले़ आरोपी आणि त्याची पत्नी यांच्यावतीने अॅड. निरंजन मुंदरगी यांनी काम पाहिले, तर सरकारी वकील जं. पी. याज्ञिक यांनी युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)