स्वयंपाक येत नसल्याने विवाहितेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 19:40 IST2016-10-23T19:40:00+5:302016-10-23T19:40:00+5:30

‘तुला स्वयंपाक चांगला येत नाही’ असे म्हणत एका विवाहितेला धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून पतीने खून केल्याची घटना लातूर तालुक्यातील धनेगाव येथे शनिवारी रात्री उशिरा घडली.

Marriage murder due to lack of cooking | स्वयंपाक येत नसल्याने विवाहितेचा खून

स्वयंपाक येत नसल्याने विवाहितेचा खून

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 23 - ‘तुला स्वयंपाक चांगला येत नाही’ असे म्हणत एका विवाहितेला धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून पतीने खून केल्याची घटना लातूर तालुक्यातील धनेगाव येथे शनिवारी रात्री उशिरा घडली. याबाबत लातूर ग्रामीण पोलिसात पती विठ्ठल उर्फ सचिन धडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद आहे. 
धनेगाव येथील दीपाली धडे या विवाहितेस पती विठ्ठल उर्फ सचिन धडे याने ‘तुला भाजी येत नाही, चांगला स्वयंपाक येत नाही’ असे म्हणून तसेच किरकोळ कारणावरून सतत त्रास दिला. शनिवारी रात्री याच कारणावरून पती विठ्ठल याने धारदार शस्त्राने दीपाली यांच्या गळ्यावर वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, खून करून पती विठ्ठल फरार झाला आहे. दीड वर्षांपूर्वी दीपाली यांचा शिरूर अनंतपाळचा मूळ रहिवासी विठ्ठल याच्यासोबत विवाह झाला होता. सध्या दीपाली माहेरीच धनेगाव येथे राहत होत्या. चार दिवसांपूर्वी विठ्ठल धनेगावला आला होता. त्याने सासरवाडीतील सर्व नातेवाईक बाहेर कामानिमित्त गेल्याची संधी साधून दीपालीसोबत भांडण काढले व धारदार शस्त्राने तिच्यावर वार करून तिचा खून केला, असे वडील आनंद एकनाथ मेकले यांनी लातूर ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार विठ्ठल याच्याविरुद्ध कलम ३०२, ४९८ भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद करीत आहेत.

 

Web Title: Marriage murder due to lack of cooking